
अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठरलेल्या कन्येचे अपघातात निधन झाल्याने पिता ‛दिपक’ च्या आयुष्यात अंधार पसरल्याची घटना १२ मे रोजी रात्री ०८.३० वाजता अमळनेर – धुळे रस्त्यावरील लोंढवे फाट्याच्या पुढे घडली. जानवे येथील भाग्यश्री दीपक पाटील ही तरुणी आपल्या वडिलांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकल ला दुधाचे कॅन बांधून एकटी जानव्याहून कधी धुळे तर कधी अमळनेर येत असे. तिला रात्रीचीही कधी भीती वाटली नाही. धाडसी कन्या भाग्यश्री मुळे दीपक पाटील यांनी व्यवसायात वृद्धी केली होती.
पोलीस खात्यात जाण्याचे स्वप्न अधुरेच राहिले…
वडिलांच्या व्यवसायात हातभार लावण्यासाठी मोटरसायकलवर दूध वाहता वाहता ‘भाग्यश्री’ ने जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, अमळनेर येथे बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. आठवडाभरा पूर्वीच बारावीचा निकाल लागून भाग्यश्री उत्तीर्ण झाली होती. तिला पोलीस खात्यात जायचे होते. मात्र.. काळाने स्वप्नपूर्ती पूर्वीच तिला हिरावून नेले.
दीड महिन्यापूर्वीच मोटरसायकल घसरून तिच्या वडिलांचा अपघात झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मोटरसायकल चालवायला बंदी घातली होती. नेहमीप्रमाणे भाग्यश्री १२ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच १९, ई बी ६०२७ वर दुधाचे कॅन घेऊन अमळनेर कडे येत असताना लोंढवे शिवारात अज्ञात वाहनाने कट मारला. कट मारल्याने मोटरसायकल रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर जाऊन आदळल्याने खाली पडून भाग्यश्रीच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला होता. भूषण पाटील यांनी जानवे गावात माहिती कळविल्यावर, गावातील लोकांनी तिला उपचारासाठी उचलून दवाखान्यात नेले. मात्र.. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.