संभाजी ब्रिगेड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार : ॲड. मनोज आखरे

संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात आढावा बैठकीत सुतोवाच

अमळनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेथे शक्य असेल तेथे स्वबळावर व जेथे शक्य नसेल तेथे कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडच्या संघटनात्मक बांधणी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे, राज्य प्रवक्ते प्रा. प्रेमकुमार बोके, प्रदेश संघटक योगेश पाटील हे राज्य दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल दिनांक २० जून रोजी संध्याकाळी शिव पेट्रोल पंप, अमळनेेर येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांसह विविध पुरोगामी शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी बहुजन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शंभर टक्के समाजकारण व शंभर टक्के राजकारण करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक मैदानात उतरणार आहे.

ॲड. मनोज आखरे म्हणाले की.. संभाजी ब्रिगेड गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकऱ्यांचा सन्मान, दारूमुक्त गाव, व्यसनमुक्त समाज हे संकल्प घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आता राजकीय पक्ष झाल्यानंतर संभाजी ब्रिगेड राज्यातील शेतकऱ्यांच्या व बेरोजगार तरुणांच्या समस्या घेऊन राजसत्ता ही सर्व सत्तांची चावी असल्याने ती ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्याच्या विविध सोपानांमधली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेडचे जे पदाधिकारी निवडणुका लढविण्यास इच्छुक असतील त्यांनी स्वबळावर, जिथे ज्या पक्षांना आवश्यक असेल त्यांना पाठिंबा देऊन किंवा ज्या पक्षांशी युती करून आपला उमेदवार निवडून येत असेल याचे स्वातंत्र्य देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवून राजसत्ता ताब्यात घ्यावी असे आवाहन केले.

याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मनोहर नाना निकम, प्रा. अशोक पवार, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. डॉ. विलास पाटील, इंजिनियर श्रीकांत चिखलोदकर, कार्याध्यक्ष महेश पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री कैलास पाटील तसेच तालुकाध्यक्ष अशोक पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या वसुंधराताई लांडगे, मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापिका शिला पाटील, गावरानी जागल्या सेनाचे विश्वास पाटील, अरुणबापू देशमुख, रमेश तात्या पाटील गडखांब, निंबा लोटन पाटील, दिनेश सुभाष पाटील झाडी, नारायण पाटील शिरसाळे, ज्ञानेश्वर पाटील बहादरवाडी, आदित्य बिल्डर्सचे इंजिनियर प्रशांत निकम, मार्केट कमिटीचे संचालक प्रा. सुभाष पाटील, बहुजन समाज पक्षाचे गौतम मोरे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डी. ए. पाटील, जयवंतराव पाटील डांगरी, निंबाजीराव पाटील फापोरे, योगेश पाटील ढेकू यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शाहू महेंद्र निकम यांनी केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!