पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रणेते तथा न. पा. चे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

अमळनेर : येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित शांतीनिकेन प्राथमिक, जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात संयुक्तरीत्या ७९ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीचे प्रणेते तथा न. पा. चे माजी नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनदाई एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डी .डी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य के. डी. पाटील, संस्थेचे सचिव राधेश्याम पाटील, संचालक नंदकुमार पाटील, खजिनदार शैलेंद्र पाटील, संचालिका प्रा. डॉ. नयना पाटील, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम .पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सामुहिक राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत म्हटले. जय योगेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत व झेंडा गीत म्हटले. विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भाषणे, गीत गायन या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.
आपल्या मनोगतात सुभाष अण्णा चौधरी म्हणाले की, धनदाई संस्था आता नावारूपाला आली असून तालुक्यात नाव लौकीक झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळावा यासाठी संस्था विविध उपक्रम राबवून घेते. पाडळसरे धरणाचे यश विद्यार्थ्यांमध्ये दडलेलं आहे. विद्यार्थ्यांनी शासनाला पोस्टकार्ड लिहिले नसते तर केंद्रामध्ये कदाचित मंजुरीच मिळाली नसती. पाडळसरे धरणामुळे तालुक्यासह अन्य काही तालुकेही सुजलाम् सुफलाम होणार आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी जावे लागणार नाही. प्राचार्य के. डी. पाटील यांनी लोकशाही दिनाचे महत्व सांगून राष्ट्र ध्वज व ध्वजातील तीन रंगांचे महत्त्व विशद केले. ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले तो दिवस शुक्रवार होता. यामुळे आजचा दिन शुभदिन असल्याचे ते म्हणाले. प्रत्येकाने वृक्षारोपण करावे असे आवाहनही केले.
अध्यक्षीय भाषणात डी. डी. पाटील म्हणाले की, संस्थेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. यामुळे आमच्या संस्थेचा नावलौकिक झालेला आहे. स्वराज्याचे सुराज्य कसे होईल ? यासाठी सर्वांनी प्रयत्न करु या असे सांगितले. याप्रसंगी जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक, शांती निकेतन प्राथमिक, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, चित्रकला महाविद्यालय व आयटीआय कॉलेजचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. शैलेंद्र पाटील यांनी तर आभार प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी मानले.