लैंगिक शिक्षणावर आधारित पुस्तिकेचे झाले प्रकाशन

अमळनेर : उमलत्या वयात स्वतःच्या शरीराबद्दल अनेक प्रश्न पडतात. त्याचे शास्त्रीय उत्तर मिळाले नाही तर मुले मानसिक आरोग्य खराब करून घेतात हे टाळावे म्हणून सोप्या शब्दात लैंगिक शिक्षण देणारी ही पुस्तिका निश्चित मार्गदर्शक ठरेल असे मत संदीप घोरपडे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनी साने गुरुजी विद्यालयात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. जयेश शिंदे यांच्या तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी पुस्तक प्रकाशन करताना ते बोलत होते. स्वातंत्र्यदिनी हा प्रकाशन सोहळा संदीप घोरपडे व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव पाटील यांनी केले.
साने गुरुजी विद्यालयात झालेल्या या सोहळ्यास पुस्तक शब्दबद्ध करणारे धनंजय सोनार, डॉ. प्रतिज्ञा शिंदे, हेमकांत पाटील, कस्तुरी प्रकाशनचे गोकुळ बागुल, माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, पत्रकार किरण पाटील, मगन पाटील, भास्कर बोरसे, प्रभाकर गुरुजी, शकील शेख, महाजन मॅडम, बोरसे मॅडम, सानेगुरुजी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नपारखी यांनी तर बापूराव ठाकरे यांनी आभार व्यक्त केले.