साथी गुलाबराव पाटील द्वितीय स्मृती समारोहाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत माहिती

अमळनेर : खानदेशची मुलुख मैदान तोफ, विधानसभेत तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार साथी गुलाबराव बापू. त्यांना आपल्यातून जाऊन दोन वर्षे पूर्ण होत आहेत. साथी गुलाबराव पाटील द्वितीय स्मृती समारोहाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.१९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. सचिव संदीप घोरपडे यांनी बापूंच्या आठवणी सांगितल्या व कार्यक्रमांविषयी माहिती दिली. बापूंच्या नावापुढे अनेक उपाधी जोडल्या गेल्या आहेत. त्यांना शिंगाडेधारी शेतकरी नेता म्हणून ओळखत. साप्ताहिक साथी संदेश दैनिकात रूपांतरित करून लोकांना वर्तमानपत्र वाचनाची आवड लावणारे, शोध पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवणारे, आपल्या चौफेर वाचनाने साहित्य विश्वाला आपलेसे करणारे, शरण आल्यावर शत्रूलाही मरण दारातून परत आणणारे, खवय्या गुलाब बापू. आपल्या कृतीने राजकारणात अचानक खळबळ उडवणारे गुलाबबापू. अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेरचे साने गुरुजी विद्यालयातर्फे बापूंच्या विविध गुणांना नवीन पिढीसोबत जोडण्यासाठी साथी गुलाबराव पाटील स्मृती समारोह आयोजित करण्यात येतो. स्मृती समारोहाचे हे दुसरे वर्ष आहे.

रविवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे सकाळी ९ वाजता महाविद्यालयीन स्तरावर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. पाच विषयावर वक्तृत्व स्पर्धा होईल.
- भारतीय संविधानाचे ७५ वर्ष : एक चिंतन
- आज गांधीजी असते तर..
- शेतकरी कष्टकऱ्यांचे कैवारी : साने गुरुजी
- कृत्रिम बुद्धिमत्ता : आधार की आव्हान
- अरे माणसा माणसा.. कधी होशील माणूस
वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम येणाऱ्यास ११ हजार, द्वितीय ९ हजार, तृतीय ७ हजार, उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी २ हजार रक्कम दिली जाईल. सोबतच आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. इतर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
सामाजिक व राजकीय पुरस्कारच का..?
साथी गुलाबराव पाटील यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे काम होते. यासोबतच ते पत्रकारही होते. या पार्श्वभूमीवर पुरस्कार दिले जातात असे सचिव संदीप घोरपडे यांनी सांगितले. यावर पत्रकार विजय गाढे यांनी बापूंचे पत्रकार क्षेत्रात काम असल्याने पत्रकार पुरस्काराचा समावेश व्हायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. ही अपेक्षा योग्य असून अंतर्मनाला स्पर्श करणारी असल्याने पुढील काळात समिती सोबत चर्चा करुन याबाबत नक्कीच विचार करु असे आश्वासित केले.
यावर्षी २०२५ चे साथी गुलाबराव पाटील स्मृती सामाजिक पुरस्कार निरंजन टकले यांना तर बच्चू कडू यांना राजकीय (पुरोगामी) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सोमवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता सामाजिक पुरस्कार व राजकीय (पुरोगामी) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. २१ हजार रुपये, स्मृतीचिन्ह (शिंगाडे धारी गुलाबराव पाटील), लाल टोपी, बागायतदार रुमाल असे पुरस्काराचे स्वरूप असेल. पुरस्कार निवड समिती शिवाय कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध प्रकारच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमांच्या प्रचार व प्रसाराचे कार्य सुरू आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी विधान परिषद सदस्य तथा मा. आ. डॉ. सुधीर तांबे असतील. वक्ते म्हणून पुरस्काराने सन्मानित झालेले मा. आ. बच्चुभाऊ कडू व ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते निरंजन टकले हे मान्यवर आपली भूमिका मांडतील. यात समाज हिताची, तरुणांना योग्य दिशेची, शेतकऱ्यांना आस भविष्याची, महिलांना खात्री सुरक्षिततेची आणि विशेष म्हणजे दिव्यांग, आबाल वृद्ध महिला या व्यक्तींच्या कठीण प्रश्नांची उजळणी होईल. यामुळे देशातील जनतेला संविधान बचावाची प्रेरणा मिळेल. या दोनदिवसीय कार्यक्रमाच्या विचार पेरणीचा लाभ घ्यावा असे आवाहन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे व सदस्य मंडळ यांनी केले आहे.
