राजकीय विदारक परिस्थिती.. लोकशाही व्यवस्था धोक्यात
अमळनेर येथे साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रमांचे आयोजन

अमळनेर : साथी गुलाबराव पाटील यांच्यात स्पष्टवक्तेपणा, नैतिकता होती. एसटी ने प्रवास असायचा. त्यांनी समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे काम दिशादर्शक होते. आज स्वार्थासाठी लोकशाही व्यवस्था धोक्यात आली. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला. समाज पैसा, जाती, धर्म यात गुरफटत असून राजकारणातून विष पेरण्याचे काम सुरु आहे. जातीभेदाच्या नावाखाली तरुणांची माथी भडकविली जात आहेत. सध्या राजकीय परिस्थिती विदारक असली तरी धीराने नेटाने काम करा, शेवटी लोकशाही मूल्यांचाच विजय होणार आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृती होणे तसेच नवं नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. ‘जे बिघडले ते नेते.. आपल्याला बोलावंच लागेल’ असे मत माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिनांक २४ व २५ ऑगस्ट रोजी साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ २५ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

पहिल्या दिवशी २४ व २५ ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा पार पडली. दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सामाजिक व राजकीय (पुरोगामी) पुरस्कार देण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर तांबे होते. सोबत विचारमंचावर पुरस्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांचेसह अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, मगन पाटील, भास्कर बोरसे, किरण पाटील, प्रा. शेख, शाळेचे मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे उपस्थित होते.

पूज्य साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..’ या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. साने गुरुजी कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वरबद्ध प्रार्थना म्हटली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूज्य साने गुरुजी व स्वर्गीय गुलाबराव बापू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ झालेल्या साथी संदेश वक्तृत्व करंडक २०२५ स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते लाल टोपी, रुमाल, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, बक्षीस रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत प्रथम आलेला मुंबई विद्यापीठाचा अभय आळशी याने ‘अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस..’ या विषयावर आपल्या दमदार शैलीत वक्तृत्व केले. बहिणाबाई आपल्या कवितांतून दैनंदिन जीवनातील माणसाच्या व्यथा सांगतात. ती खरी क्रांती. सोबतच त्यांनी मेधा पाटकर, ब्रम्हपुत्रे आदींचे दाखले दिले. माणसाला देव बनवून ठेवणं कसं चूकीचं हे उदाहरण देऊन पटवून दिले. उपस्थित श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली.

प्रास्ताविक करताना अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी स्व. गुलाबराव बापूंच्या आठवणींना उजाळा दिला. नवीन पिढीला गुलाबराव पाटील कसे कळतील ? त्यांचे विचार पेरता यावेत यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गुलाबराव बापूंचा पुरोगामी विचारांचा वारसा आम्ही चालवत आहोत, त्यांचा हा वैचारिक वारसा हीच आमची श्रीमंती असल्याचे सांगितले. याप्रसंगी गुलाबराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देणारा रयत जगत अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

लोकांना सत्य सांगणं हीच खरी पत्रकारिता : निरंजन टकले
सामाजिक पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी देशातील विदारक राजकीय स्थिती समजावून सांगितली. सानेगुरुजींचे विचारच पुढे तारतील. लोकांना सत्य सांगणं हीच खरी पत्रकारिता आहे पण.. तसं होत नाही. लोकशाही कशाला म्हणायचे ? हा प्रश्न पडतो. माहिती अधिकारातून अजय बोस यांनी राष्ट्रपती भवनातून उपराष्ट्रपती यांचा राजीनामा आपल्याला कधी प्राप्त झाला ? तो कधी मंजूर झाला ? नवीन उप राष्ट्रपती निवडीचे नोटिफिकेशन कधी काढलं ? अशी माहिती मागवली होती. यावर उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आहे याबाबत आमच्या कार्यालयाकडे कोणतीही माहिती नाही असे लेखी उत्तर राष्ट्रपती भवनातून देण्यात आले आहे. तेच उप राष्ट्रपती राजीनामा दिल्यापासून गायब आहेत, या स्थितीला आपण पोहोचलो आहोत, याच साठी महापुरुषांनी संघर्ष केला होता का ? यावरुन खरं ते काय ? असा प्रश्न पडतो. उपराष्ट्रपतींनी राजीनामा राष्ट्रपतींना द्यावा लागतो अशी पध्दत आहे. मग उपराष्ट्रपती यांनी दिलेला राजीनामा खोटा होता का ? असाही प्रश्न उपस्थित केला. ईडी च्या ५८९२ केसेस झाल्या यात फक्त ८ निकाल लागले. हे शस्त्र पक्ष फोडण्यासाठीच होते का ? यावर सामान्य नागरिकांनी आवाज उठवायला हवा. सन २०१४ नंतर हे प्रकार घडायला लागले. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला मतदान चोरी संदर्भात पुरावे दिले. मात्र प्रतिज्ञापत्र मागितले जाते यावर आयोग आपली भूमिका टाळत आहे. साहजिकच भाजपा आणि निवडणूक आयोग यांची मिलीभगत असल्याचे दिसून येते. संविधानिक संस्था पारदर्शक असायला हवी. व्यक्ती स्वातंत्र्य आहे तरी कुठे ? गो हत्या बंदी असताना बीट एक्स्पोर्ट होते कसे ? पूर्वी मतदार सरकार निवडायचे.. आता सरकार मतदार निवडतात. अलीकडे लाडक्या बहिणी अपात्र कशा.. यास संसदेतील लाडके भाऊ जबाबदार आहेत. बहुजनांच्या पोरांना ६६ हजार शाळा बंद करून शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. असा भारत कधी नव्हता, विनाशाकडे वाटचाल सुरु आहे. बोलणारे खूप असतात पण तसं वागत नाही.. बोलेल तसंच वागलं पाहिजे. ही वैचारिक लढाई असल्याने मुलांना शिकवा, संवैधानिकता पाळा.. हीच खरी बापूंना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संकल्प करा..अन्यथा किंमत मोजावी लागेल असेही स्पष्ट केले.
मतांची नव्हे तर मनाची चोरी : बच्चुभाऊ कडू
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांनी सरकारवर प्रहार करताना शेतकरी, गोरगरीब, अनाथ, दिव्यांग जनतेच्या व्यथा मांडल्या. दुष्काळ पडल्या नंतर कर्ज माफ करु असे म्हणणारे मुख्यमंत्री आज ओला दुष्काळ पडूनही काही बोलायला तयार नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या मतावर आमदार खासदार निवडून येतात त्यांच्यावरच सर्वात जास्त अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलना पेक्षा गावातील गणपती बसवायला जास्त लोक एकत्र येतात, एवढी उदासीनता आज समाजात आहे. हे सांगताना आता कुणासाठी लढावं.. अशी अवस्था निर्माण झाली आहे.. कधी कधी पश्चात्ताप येतो. दु:ख वाटते.. ज्यांचे साठी लढावं तेच पेटून उठत नाही अशी खंत व्यक्त केली. जाती धर्माच्या नावाखाली सारं काही चाललं आहे. व्यवस्था कां अशी होते..? कुठे आहेत संवेदना..? जात, पात, धर्म, राजकीय गुलाम ही मोठी समस्या आहे. मतांची नव्हे तर समाजमनाची चोरी होते आहे. माणूस मानसिक गुलामीत जीवन जगतो. सत्ता महत्वाची वाटते.. गावागावात राजकीय गुलाम झाले असून इतके निष्ठावंत आहेत की, बाप मेला तरी चालेल पण नेत्याला काही बोलायच नाही अशी भूमिका घेणारे निष्ठावंत शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची लढाई मोठी होत नाही. कोणताही झेंडा हाती असावा पण.. प्रगतीच्या आड येणारा नसावा. समाजमन मेलं आहे. ब्रेकिंग काय हेच लक्षात येत नाही.. घराघरात बॉम्ब टाकला जात असून येणाऱ्या पिढीला ते घातक आहे. मतदार हा आत्मा असून चिंतन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. एस. पाटील, विलास चौधरी यांनी केले. पुरस्कार वितरण समारंभाला शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते, दिव्यांग बंधू, सुजाण नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या साने गुरुजी विद्यामंदिर, साने गुरुजी नूतन माध्य.विद्यालय, साने गुरुजी कन्या शाळा आणि साने गुरुजी अंगणवाडी च्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.