‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत चिमुकले गाण्याच्या तालावर थिरकले

अमळनेर : सालाबादाप्रमाणे सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असतो. यावर्षी शहरातील गलवाडे रोडवरील प्रतापशेठ नगर मध्ये चिमुकल्यांनी एकत्र येऊन सात दिवसांचे बाप्पा स्थापित केले होते. दररोज होणारी बाप्पा गणरायाची सजावट, मोदक, गोडाधोडाचे नैवेद्य, आणि स्वरबद्ध वातावरण यामुळे घर नव्हे तर संपूर्ण परिसर उजळून निघत होता. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर विसर्जन होईस्तोवर सात दिवस दररोज सकाळ संध्याकाळ सामुहिकपणे भक्तिपूर्वक पूजा, आरती करण्यात आली. दरम्यानच्या काळात महिलांनी संगीत खुर्ची खेळाचा आनंद घेतला.

गणरायाचे आगमन झाल्यानंतर दहा दिवसांचा काळ हा खऱ्या अर्थाने पर्वणी मानला जातो. काल सातव्या दिवशी बाप्पाला आनंदमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी चिमुकल्यांसह महिला गाण्याच्या तालावर थिरकल्या. ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत गुलालाची उधळण केली. चिमुकले गणेशभक्त रोहन ठाकूर, शिसोदे, युग शर्मा, कार्तिक पाटील, वेदांत हांडोरे, ओम चव्हाण, नुपूर शर्मा, देवेश्री पुरी, पाटील अस्मिता चव्हाण, देवयानी पुरी, आरोही परदेशी, जान्हवी पाटील, नैतिक साळुंखे, मानव हांडोरे आदींनी मनसोक्त आनंद घेतला. आनंदमय वातावरणात गणेशभक्तांनी नदीपात्रात जाऊन बाप्पा गणरायाचे विसर्जन केले. यावेळी विसर्जन यात्रेत प्रतापनगर परिसरातील पुरुष, महिला गणेशभक्त उपस्थित होते.