
अमळनेर : संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक दिनानिमित्ताने ‘माझा क्लास, माझे झाड’ या प्रभावी संकल्पनेअंतर्गत पर्यावरणपूरक वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (PTA) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात राज्यभरातील विविध PTA क्लास संचालकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. अमळनेरमध्येही या मोहिमेचा प्रतिसाद उमटला. अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे सक्रिय सहकार्याने अंबरिष ऋषी टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पर्यावरण संवर्धनाची जागरुकता निर्माण करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान सर्वांनी मिळून वृक्षारोपण केले व पर्यावरण संरक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष भैय्यासाहेब मगर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “शिक्षक दिन हा केवळ शिक्षकांचे सन्मान करण्याचा दिवस नसून, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण व पर्यावरण संवर्धन दोन्हीची जबाबदारी आपल्याला पेलणे आवश्यक आहे.” या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक व समाजातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची सखोल जाणीव निर्माण होण्यास मदत होणार आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचे वचन PTA संघटनेने दिले आहे.
कार्यक्रमास अमळनेर PTA क्लासेस संघटनेचे शिक्षक सदस्य भैय्यासाहेब मगर (अध्यक्ष), किरण माळी, ॲड. नागराज माळी, राकेश बडगुजर, सुरश्री वैद्य मॅडम, शेखर कुलकर्णी, ज्ञानेश्वर मराठे, सुधीर टाकणे, हर्षल बडगुजर, संदीप महाजन, स्वर्णदिप राजपूत आणि अंबरिष ऋषी टेकडी ग्रुप उपाध्यक्ष नरेश कांबळे, सूरज अभंगे उपस्थित होते. तसेच सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिता धनगर, वनपाल वैशाली साळी, वनरक्षक सिमा शिंदे, वनरक्षक दिनेश देवरे, रोप वाटिका वनमजूर दिनेश सैंदाणे, सहकारी प्रमोद पाटील, सहकारी भटू पाटील यांचे याकामी सहकार्य लाभले.