संघटना वाढीसाठी तुमचा दृष्टिकोन, कृती आणि निकाल या त्रिसूत्रीची आवश्यकता : कपिल पवार

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचा उपक्रम

जळगाव : देशासाठी लेखणीची ताकद महत्त्वाची असून या लेखणीमुळेच देश महासत्ता होऊ शकतो. भावना असते पण त्यावर कृती काय ? हे तुमचं नेतृत्व ठरवतं. प्रत्येक शुद्ध आत्मा सूर्याच्या ताकदीसारखा आहे. संघटना वाढीसाठी तुमचा दृष्टिकोन, कृती आणि निकाल या त्रिसूत्रीची आवश्यकता असल्याचे मत आदिवासी विकास महामंडळाचे उपायुक्त कपिल पवार यांनी सकाळच्या सत्रात व्यक्त केले. अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे राज्यस्तरीय केडर कॅम्प २०२५ मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उर्दू विंग चे राष्ट्रीय अध्यक्ष नदवी, प्रा. अशोक पवार, कोअर कमिटी चे वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख, सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले आदी उपस्थित होते.

नेतृत्व कसे असावे हे स्पष्ट करताना श्री कपिल पवार म्हणाले की, आत्मशुद्धता, व्यक्तिमत्व, सहानुभूती, दृष्टिकोन अनुभव या माध्यमातून नेतृत्व विकसित होत असते. हे पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सांगितले. संघटना कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभी राहते. चांगला नेता स्वतः त्याचे उदाहरण असतो. संघटना अधिक प्रभावी होण्यासाठी शिस्त आणि नेतृत्व यांचा परस्परांशी संबंध स्पष्ट केला.

देण्यातला जो आनंद आहे तो घेण्यात नाही : प्रा. अशोक पवार

दुपारच्या सत्रात देशासाठी बलिदान दिलेल्या महामानवांना अभिवादन करत मनोगत व्यक्त करताना प्रा. अशोक पवार म्हणाले की, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पत्रकारांचे मोठे काम आहे. नेतृत्व करताना तुमच्या मनात व कृतीमध्ये देशाचे, समाजाचे संरक्षण करण्याची भूमिका असायला हवी. कोणत्याही पदात लोकशाहीचा गुण असला पाहिजे. मिळालेल्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे. आज आपण सर्व यशस्वी आहात पण आनंदी नाही.. मन अपसेट आहे. यामुळे आनंदी राहायचे असेल तर देत चला. देण्यातला जो आनंद आहे तो घेण्यात नाही म्हणून शक्य तेवढे प्रेम द्या असा संदेश दिला. यावेळी अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाची माहिती दिली. व्हॉईस ऑफ मीडिया देशातील पत्रकारांसाठी मोठं योगदान देत असून संदीप काळें सारखं नेतृत्व लाभल्याचे कौतुक केले.

दोनही सत्रात प्रश्नोत्तरासाठी वेळ देण्यात आला होता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील व्हॉईस ऑफ मीडिया चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर टीमचे पदाधिकारी व सदस्य, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!