‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ग्लोबल महातेज चे झाले प्रकाशन

अमळनेर : ‘माझा शब्द.. माझा ईमान मला विकायचा नाही असा विश्वास ठेऊन पत्रकारिता करायला हवी. अशा पत्रकारितेला मीडियात अनन्य साधारण महत्त्व आहे. पत्रकाराची लेखणी सामाजिक सलोख्यासाठी कारणी लागली पाहिजे. ती जबाबदारी आपल्यावरच आहे’ असे मत ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम तर्फे आयोजित राज्यस्तरीय केडर कॅम्प २०२५ मध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष नदवी, कोअर टीमचे पदाधिकारी उपस्थित होते.
- या कार्यक्रमात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ‘ग्लोबल महातेज’ चे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष नदवी, कोअर टीमचे पदाधिकारी यांचेसह मंगळग्रह सेवा संस्थेचे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त एस. बी. बाविस्कर, शरद कुलकर्णी, भरत पाटील आदी उपस्थित होते. ग्लोबल महातेज” या दैनिकाचे सर्वेसर्वा आनंद डिगंबर महाले यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार शरद कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री देवकर पुढे म्हणाले की, पत्रकारिता हीच खऱ्या पत्रकाराची संपत्ती व तीच जात जमात असते. मूल्याधारित पत्रकारिता करताना काय खस्ता खाव्या लागतात हे पत्रकारांना चांगलेच ठाऊक आहे. पत्रकाराने जगाच्या कलहात बरोबर असलं पाहिजे. सभोवताली अनेक प्रश्न आहेत त्यासाठीच तर पत्रकारिता आहे. बाकीच्यांत भेदाभेदीचे, जातीपातीचे राजकारण केले जात आहे. आज प्रत्येक व्यक्ती हे माध्यम झाले आहे. आजच्या परिस्थितीत मोबाईलच्या जमान्यात माणूस माणसाजवळ येईना, हे एक आव्हान आहे. अशा आव्हानांना पेलत व्हॉईस ऑफ मीडिया सारखी एक संघटना उभी राहते हे कौतुकास्पद आहे. संतापाच्या पलीकडे जाऊन सक्रियतेकडे जायला हवे, मतभेद असले तरी संघटन असावे. ती किमया व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेत आहे असेही ते म्हणाले. आपल्या लेखणीच्या माध्यमातून जे आपले कर्तृत्व जगभर गाजवत आहेत त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्रातील व्हॉईस ऑफ मीडिया चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.