आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी : संदीप काळे

अमळनेर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्यस्तरीय केडर कॅम्प चा समारोप


अमळनेर : “पत्रकार हा समाजाचा कणा आहे. मात्र आज मीडिया क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. डिजिटल, सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रांत नवे ट्रेंड्स, नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा काळात संघटनाशिवाय पत्रकारांचे प्रश्न सोडवणे अशक्य आहे. आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी आहे,” असे ठाम मत व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी व्यक्त केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम या संस्थांनी एकत्र येऊन पत्रकारांना जगभर जोडण्याचा आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचा दोन दिवसीय राज्यस्तरीय केडर कॅम्प अमळनेरच्या मंगळग्रह मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकारांना सशक्त करण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि बदलत्या मीडिया परिदृश्यात सज्ज करण्यासाठी हा कॅम्प महत्त्वाचा ठरला. राज्यभरातून २१ जिल्ह्यातील ५७ तालुक्यातील सुमारे २५० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवून व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनात्मक चळवळीला नवी ऊर्जा दिली.

कॅम्पचा समारोप संस्थेचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते झाला. कॅम्पच्या दोन दिवसांत पत्रकारितेतील बदलते पैलू, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने, संघटनाच्या गरजा आणि व्हॉईस ऑफ मीडिया तसेच व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमने केलेले प्रयोग यावर सखोल विचारमंथन झाले. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी तळागाळातील पत्रकारांना प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली. महिला पत्रकारांचे प्रश्न, स्थानिक पत्रकारांची आव्हाने, डिजिटल युगातील कौशल्ये, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, पत्रकारांसाठी आरोग्य विमा व कायदेशीर मदत या मुद्द्यांवर ठोस चर्चा झाली.

यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांचेसह राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष नदवी, आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार, प्रा. अशोक पवार, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित देशमुख, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, राज्य समन्वयक कुमार कडलक, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य गोरक्षनाथ मदने, महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, ग्रामीण महिला प्रदेशाध्यक्ष सविता चंद्रे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष संगम कोटलवार, वर्धा जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख, सर्व विंगचे प्रमुख अमोल मतकर, नाशिक विभागीय अध्यक्ष मिलिंद टोके, नाशिक जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे, जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले आदी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या शिबिरात संदीप काळे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, क्षेत्रीय संघटक आणि मीडिया अभ्यासकांनी मार्गदर्शन केले. या कॅम्पचे उत्कृष्ट नियोजन संयोजक व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस तथा श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, अमळनेर शाखा व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कोर टीम महाराष्ट्रने केले. संदीप काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून पुढील उपक्रमांची रुपरेषा मांडली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!