प्रा. डॉ. लिलाधर पाटील लिखित ‘ट्रॅडिशन्स इन इंडियन लिटरेचर्स’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन

विविध प्रांतीय भाषा व महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या परंपरेचा वेध घेणारे पुस्तक

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : येथील धनदाई महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. लिलाधर पाटील लिखित “ट्रॅडिशन्स इन इंडियन लिटरेचर्स” या इंग्रजी पुस्तकाचे नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर, विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. वर्षा पाटील, डॉ. गजानन पाटील व आर. सी. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. महाजन आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.

अथर्व प्रकाशन, जळगाव तर्फे प्रकाशित या पुस्तकाचा विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात समावेश असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित हे पुस्तक आहे. भारतीय ज्ञानपरंपरा ही एकल परंपरा नसून यात विविध भाषा, धर्म, तत्त्वज्ञान व सौंदर्यविषयक दृष्टींचा समावेश आहे. या परंपरेचा वेध घेत संस्कृत, प्राकृत, पाली तसेच विविध प्रांतीय भाषा व महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या परंपरेचा वेध घेणारे हे पुस्तक इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना आपल्या साहित्यिक परंपरेची जाणीव निर्माण करून देईल अशी अपेक्षा डॉ. लिलाधर पाटील यांनी व्यक्त केली. शिरपूर येथील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यापीठ क्षेत्रातील इंग्रजी प्राध्यापकांच्या अभ्यासक्रम शाळेत सदर पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार लागू झालेल्या अभ्यासक्रमात डॉ. लिलाधर पाटील यांचे हे दुसरे पुस्तक असून मागील वर्षी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत लिहिलेल्या ‘इंग्लिश फॉर ऑल’ या पुस्तकाचे केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे प्रकाशन करण्यात आले होते. ते पुस्तक प्रथम वर्ष इंग्रजी विषयासाठी अभ्यासाला असून हे नव्याने प्रकाशित झालेले पुस्तक द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. याबद्दल इंग्रजी विषयातील अभ्यासक्रम मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच उत्तर महाराष्ट्र इंग्रजी प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉ. पंडित चव्हाण, सेक्रेटरी डॉ. दिनानाथ पाटील, सिनेट सदस्य डॉ. धीरज वैष्णव, प्रा. नितीन पाटील यासह सर्व सदस्यांनी त्यांचे याप्रसंगी विशेष अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कमलाकर पाटील व मुख्य समन्वयक डॉ. आर. व्ही. सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!