महात्मा फुले हायस्कूल, देवगाव येथे लोकशाही पद्धतीने विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड

शपथविधी, सत्कार आणि मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना मिळाला लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव

(दिव्यचक्र वृत्तसेवा)

अमळनेर : तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल, देवगाव येथे लोकशाही व्यवस्थेची जडणघडण ही केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना समजावी, या उद्देशाने इयत्ता आठवीच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी व सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थ्यांमधून लोकशाही पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवून वर्गमंत्री, अर्थमंत्री, अभ्यासमंत्री व सफाईमंत्री यांची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीचा अनुभव मिळाला. मतदान कसे केले जाते ? प्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया कशी असते ? तसेच निवडून आलेल्या प्रतिनिधींची जबाबदारी काय असते ? याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थी मंत्र्यांना पदाची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त, स्वच्छता, अभ्यासातील सातत्य, वेळेचे पालन, सहकार्याची भावना आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.

विद्यार्थी मंत्रिमंडळामध्ये निवड झालेले प्रतिनिधीमध्ये : वर्गमंत्री – हर्षाली सुधीर पाटील, अर्थमंत्री – मोहिनी दिपक पाटील, अभ्यासमंत्री – विराज अविनाश पाटील, स्वच्छता मंत्री –जयेश सुभाष बैसाणे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शपथेमध्ये, “माझ्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे, निःपक्षपातीपणे व कर्तव्यभावनेने पार पाडेन. शाळेची शिस्त, स्वच्छता, अभ्यास, वेळेचे पालन तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये बंधुभाव, सहकार्य व लोकशाही मूल्ये जोपासण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. माझ्या शाळेचा मान व गौरव वाढविण्यासाठी नेहमी तत्पर राहीन,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शपथविधीनंतर निवड झालेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचा वर्गशिक्षक आय.आर. महाजन यांच्या हस्ते पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या, कार्यपद्धती आणि शाळेच्या विकासासाठी करावयाच्या योगदानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक एस.के. महाजन आणि एच.ओ. माळी यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवड प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. भविष्यात जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!