
(दिव्यचक्र वृत्तसेवा)
अमळनेर : स्मार्ट मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना येणाऱ्या दुप्पट-तिप्पट वीज बिलाच्या तक्रारी वाढत असल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर च्या वतीने आज महावितरण वीज कंपनी लिमिटेड, अमळनेर उपविभाग – १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय धांडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील आशयानुसार स्मार्ट मीटरबाबत कार्यशाळा आयोजित करून स्मार्ट मीटर बद्दलचे संभ्रम दूर करुन संपूर्ण माहिती ग्राहकांना देऊन निरसन करण्यात येईल अशी ग्वाही अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांनी यावेळी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. ज्या ग्राहकांचे जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांना नेहमीपेक्षा जास्त बिले येत आहेत. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ आणि वीज कायदा २०२३ नुसार ग्राहकाला योग्य माहिती, संपूर्ण पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. परंतु या प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येत नाही. यामुळे १) स्मार्ट मीटरबाबत संपूर्ण माहिती ग्राहकांना देण्यात यावी. २) मीटरबाबत शंका असल्यास ती कोणत्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविली जाते याबत पारदर्शकता ठेवावी. ३) मीटर अचूक असेल तर त्याचे फायदे तांत्रिक तपासणीद्वारे ग्राहकांना पटवून द्यावेत. ४) स्मार्ट मीटरची सक्ती न करता ग्राहकांच्या संमतीशिवाय जुने मीटर बदलू नयेत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी विजय शुक्ला, मकसूद बोहरी, सुनिल वाघ, सतीश देशमुख, नरेंद्र बाळू पाटील, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सारजे, सुभाष पाटील घोडगावकर उपस्थित होते.