सरस्वती विद्या मंदिर शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

सावित्रीच्या लेकींनी स्व:संरक्षण करण्यास समर्थ होणे काळाची गरज : रणजित शिंदे

अमळनेर : येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शिक्षणासाठी बाहेर पडलेल्या सावित्रीच्या लेकींनी स्व: संरक्षणाचे धडे गिरवून साजरी केली. कराटे प्रशिक्षक एस.वाय.करंदीकर यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रणजित शिंदे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. उपस्थित शिक्षकांनीही प्रतिमेचे पूजन केले.

‘ निर्भयांवर झालेला अत्याचार आणि लहान मुलींपासून ते तरुणीची छेड काढण्याचे प्रकाराने देश हादरून गेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षणाची द्वारे सताड उघडी करून दिल्यानंतर शिक्षणासाठी बाहेर पडलेल्या सावित्रीच्या लेकींनी आता आत्मभान जागृत करून स्व:संरक्षण करण्यास समर्थ होणे काळाची गरज आहे !’ असे मत रणजित शिंदे यांनी व्यक्त केले.

कराटे प्रशिक्षक एस.वाय.करंदीकर म्हणाले की, ‘बदलत्या काळात मुलींनी स्व:संरक्षणासाठी स्वतः सिध्द व्हावे तर मुलांनी कोणत्याही मुलीची छेड काढण्याऐवजी सर्व मुलींना आपल्या बहिणी समजून त्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावे.’ असे आवाहन केले.

मुली व महिलांना लक्ष करून कुप्रवृत्तीचे धाडस वाढल्याने स्रियांवरील अत्याचार वाढले आहेत. महिलांचे दागिने-पर्स लुटण्याचे गुन्हेगारीच्या घटनातही वाढ झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर काळाची गरज म्हणून मुलींना शिक्षणानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अश्यावेळी त्यांना शारीरिक व मानसिकरीत्या सक्षम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. म्हणून सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने बालिका दिवस साजरा करतांना सावित्रीच्या लेकींनी स्व: संरक्षणाचे धडे गिरवले. संकटकाळी स्व: संरक्षणासाठी करावयाच्या विविध आक्रमक पद्धतींचे, लढण्याच्या कलांचे प्रात्यक्षिक करंदीकर यांनी दाखविले. मुलींच्या नाजूक हातांनी कौल फोडणे, गुन्हेगाराच्या पकडीतून हात सोडवणे, डोक्याच्या केसांना ओढत फरफटत नेणाऱ्या पुरुषांच्या पकडीतून डोकं सोडविणे, गुंडांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचे सहज जमतील अश्या पद्धती विद्यार्थिनींना शिकवण्यात आल्या. या प्रशिक्षणामुळे उपस्थित विद्यार्थींनींचा आत्मविश्वास दुणावल्याचे दिसत होते. सुत्रसंचालन परशुराम गांगुर्डे यांनी तर आभारप्रदर्शन धर्मा धनगर यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिलीत. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!