सहा वर्षे अथक परिश्रमाने डॉक्टरेट पदवी
अमळनेर : येथील पोलीस दलात गोपनीय शाखेत अंमलदार पदावर कार्यरत असलेले शरद तुकाराम पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने नुकतीच राज्यशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी.पाटील यांच्या हस्ते पीएच. डी.देऊन गौरविण्यात आले. यावेळी मार्गदर्शक प्रा. डॉ.विजय तुंटे, भाऊ प्रकाश तुकाराम पाटील, अमळनेर कोर्टचे सिनिअर स्टेनोग्राफर सोबत होते.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतूून शरद पाटील हे आपले यशोशिखर गाठत आहेेत. सध्या ते अमळनेेर पोलीस दलात कार्यरत असून धकाधकीच्या क्षेत्रात असूनही शिक्षणाच्या ओढीमुुळे त्यांनी विविध पदव्या प्राप्त केल्या आहेत. चौथी मध्ये असताना वडील वारले आणि संसाराचा गाडा पूर्णतः आईवर येऊन पडला. मग जोडीला आधार म्हणून मोठे बंधू व स्वत: पार्ट टाईम जॉब व शिक्षण केले. दहावी नंतर फिटर व इलेक्ट्रीशियन या दोन विषयात आयटीआय मधून शिक्षण घेेतले. कॉम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग कोर्स, बी.एड., एम.ए. आणि आता पीएच. डी.अशी शरद पाटील यांची शैक्षणिक वाटचाल आहे. “भारतीय राजकारणातील नवीन प्रवाह” (संदर्भ : आम आदमी पार्टीची राजकीय वाटचाल) हा त्यांच्या संशोधनाचा विषय असून येथील प्रताप महाविद्यालयातील प्रा.डॉ.विजय तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आहे. मार्गदर्शक प्रा. डॉ.विजय तुंटे, जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरेे यांनी शरद पाटील यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
डॉ.शरद पाटील यांनी आपल्या पदवीचे श्रेय आई, मोठे बंधू प्रकाश पाटील, वहिनी सौ.मंजू प्रकाश पाटील, पत्नी रुपाली शरद पाटील तसेच गुरुवर्य डॉ. विजय तुंटे, प्रा. पाडवी, जळगांव व अमळनेर पोलीस दल, जिराळी ग्रामस्थ यांना दिले आहे. या यशात ज्यांनी प्रेरणा दिली, अनमोल सहकार्य, मार्गदर्शन लाभले अशा सर्वांचा वाटा असल्याचे ते सांगतात.