हजारोंच्या उपस्थितीत दीदींनी जनतेला दिला जीवन जगण्याचा मंत्र

अमळनेर : आपल्या मनाविरुध्द एखादी गोष्ट घडली तर ते अशांती व चिंतेचे कारण बनते. आपला अहंकार हेच त्याचे मूळ कारण आहे. मात्र.. परिस्थिती समजून त्यातून मार्ग काढल्यास जीवन सफल होते असे मत राजयोगिनी ब्रम्हकुमारी शिवानी दीदी यांनी ‘खुशनुमा जीवन जीने की कला’ या विषयी प्रवचन करतांना व्यक्त केले. येथील प्रजापिता ब्रम्हकुमारीज तर्फे आयोजित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ‘ओमशांती’ चा जप करत त्यांनी जनतेला आनंदी जीवन जगण्याचा मंत्र दिला.
राजयोगिनी ब्रम्हकुमारी शिवानी दीदींचे शुभ हस्ते समई ज्योत पेटवून कार्यक्रमास सुरुवात झाली. अदिती लाड़ हिने नृत्य करुन स्वागत केले. यानंतर शिवानी दीदींचा नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार उन्मेश पाटील, विद्यमान आमदार अनिल पाटील, आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार बी.एस.पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, दिलीप सोनवणे, ॲड.ललिता पाटील, जयश्री पाटील, मिनाक्षी दीदी, बजरंगलाल अग्रवाल, निरज अग्रवाल व प्रजापिता ब्रम्हकुमारीज चे समन्वयक उपस्थित होते.

शिवानी दीदी पुढे म्हणाल्या की, आपण आपल्या मनाचे मालक असून त्याचा रिमोट आपल्याच हातात आहे. तरीही दुसऱ्यामुळे आपला आनंद हिरावला जातो. साहजिकच त्यामुळे चूकीचे व्यवहार होवू लागतात. परिस्थिती म्हणजेच लोकांचा व्यवहार व मनस्थिती म्हणजे आपण. दोन्ही जण आनंद कमी होण्यास स्वत: जबाबदार आहेत. हे सर्व अहंकारातून घडते व अहंकारातूनच व्यवहार बंद होतात. त्यासाठी संस्कारक्षम मन असावं लागतं. आनंद हेच आपलं जीवन आहे. तक्रार करण्यापेक्षा परमेश्वर, मन आणि शरीर, लोक, प्रकृती यांचे आभार मानायला हवे. आभार मानल्याने आत्म्याची शक्ती वाढते. विचारधारा चांगली असण्यासाठी मी शक्तीशाली आत्मा आहे, मी नेहमी आनंदी आहे, कोणत्याही परिस्थितीत मी शांत आहे, परमेश्वर नेहमी माझ्यासोबत आहे, माझे शरीर स्वस्थ आहे, मला सर्व नाते प्रिय आहेत, माझे घर स्वर्ग आहे असे संकल्प सांगितले. दररोज सकाळी झोपेतून उठताना, दिवसा दर दोन तासांनी, रात्री झोपण्यापूर्वी संकल्पांचे स्मरण करावे. जेवण करतेवेळी टीव्ही, मोबाईलचा वापर टाळावा. तसे न केल्यास त्याचा मन आणि शब्दांवर असर पडतो असेही त्या म्हणाल्या. त्यांना ऐकण्यासाठी स्वामी विवेकानंद स्कूलच्या प्रांगणात खच्चून गर्दी होती. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.