हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात जाणार
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत तब्बल १ लाख ७० हजार कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यालय, अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी शिक्कामोर्तब केले. हा निधी तब्बल १० कोटी लोकांच्या थेट बँक खात्यात वळविला जाणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे परिणाम झालेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी वापरला जाईल. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे असंही आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं.
यात, प्रधानमंत्री अन्न योजना अंतर्गत ५ किलो गहु अथवा तांदूळ व १ किलो दाळ पुढील ३ महिने दरमहा मोफत मिळेल. कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं विमा कवच मिळणार आहे. मनरेगा कर्मचारी यांना २ हजार रूपये दिले जातील व बिदागी रुपये २०२ करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग यांना दरमहा १ हजार रुपये पुढील ३ महीने मिळणार आहेत. DVR माध्यमातुन डायरेक्ट खात्यावर रक्कम जमा होईल. जनधन खाते असलेल्या महिलांच्या खात्यावर पुढील ३ महीने दरमहा ५००/- रुपये जमा करण्यात येतील. उज्वला लाभार्थी महिलांना पुढील ३ महीने गैस सिलेंडर मोफत मिळेल. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये पुढील ३ महीने जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील. स्वयं सहायता समुहास विना गारंटी २० लाख पर्यंत कर्ज मिळेल. तीन महीने EPF चे पैसे देणार यात, १५ हजार पगारधारकांना लाभ मिळेल. १०० पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपनीस मदत देण्यात येईल.