‘वर्धमान संस्कार धाम, मुंबई’ यांचे मदतीने ‘गौ-क्षेत्र प्रतिष्ठान’ संचलित ‘श्रीमती भानूबेन गौ-शाळा, अमळनेर’ यांचे द्वारा मानवता धर्माचे पालन

पंधरा भोजन केंद्रांवर नियमांचे पालन करत दररोज ४५०० गरीब, गरजू लोकांना दोन वेळचे सकस जेवण

अमळनेर : कोरोना या संसर्ग जन्य साथीच्या संकटमय काळात ‘जगा आणि जगू द्या’ या भगवान महावीर यांच्या मानवतावादी संदेशानुसार प.पु.जैन संत गुरुदेव चंद्रशेखर विजयजी म सा यांच्या प्रेरणेने ‘वर्धमान संस्कार धाम, मुंबई’ यांचे मदतीने येथील ‘गौ-क्षेत्र प्रतिष्ठान’ संचलित ‘श्रीमती भानूबेन गौ-शाळा ‘ यांचे द्वारा ‘भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी’ या मानवता धर्माचे पालन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉक डाऊन मध्ये रोजंदारी व हातावर पोट भरणाऱ्यांऱ्या गोर गरीब लोकांची, मुलाबाळांची होणारी उपासमार लक्षात घेऊन ता.५ एप्रिल पासून अन्नक्षेत्र सुरू करण्यात आलेले आहे. तरुण सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर वापरण्याच्या नियमांचे पालन करून दररोज ४५०० गरीब, गरजू लोकांना दोन वेळचे सकस जेवण पंधरा भोजन केंद्रांवर दिले जात आहे. अमळनेर शहरातील ताडेपुरा परिसरात तीन केंद्र, रुबजी नगर परिसरात तीन केंद्र, पैलाड, खाँजा नगर, बंगाली फाईल, गांधली पुरा, जुने बस स्टँड, शहा आलम नगर, म्हाडा वस्ती, आमलेश्वर नगर झोपडपट्टी व गौ-शाळा येथे प्रत्येकी एक याप्रमाणे १५ अन्नक्षेत्र भोजन केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत.

या १५ केंद्राच्या माध्यमातून ४५०० गरीब लोकांना कार्ड देण्यात आलेले असून या कार्डधारकांच्या कुटुंबातील एक सदस्य दररोज दोन वेळा ठरवून दिलेल्या जागी अन्नक्षेत्र केंद्रावर येऊन सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कुटुंबातील सदस्य संख्येच्या प्रमाणात जेवण घेऊन जातो. याकामी अनेक सामाजिक कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क व सॅनिटायझर वापर करीत नियमांचे कटाक्षाने पालन करीत सेवाभावी उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही या सेवाभावी कार्यासाठी ५० हजार रुपयांची रोख मदत केली आहे. समाजावर कोसळलेलं संकट निवारण होईपर्यंत गोर गरिबांना अन्नक्षेत्राचे माध्यमातून अन्नदानाचे काम सुरूच ठेवण्याचा निर्धार आहे. यासाठी आर्थिक वा वस्तू रूपाने मदत देण्यासाठी दाते व्यक्ती व संस्था यांनी आपला हातभार लावावा. गोक्षेत्र प्रतिष्ठान, अमळनेर यांचे I D B I बँकेच्या ०५१९१०४००००९५०२६ या खाते क्रमांकावर IFSC code: IBKL0000519 नुसार खात्यात थेट आर्थिक रक्कम जमा करावी अथवा प्रत्यक्ष मदत देण्यासाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्नक्षेत्र योजनेसाठी श्रीमती भानूबेन शहा गोशाळा चे संचालक चेतन शहा, राजुभाई सेठ, चेतन सोनार, प्रा. अशोक पवार, महेंद्र पाटील, डी.ए.धनगर, गोक्षेत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मीना शहा, विक्रम पाटील, दिलीप डेरे, सतिष वाणी, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, संजय शर्मा आदींच्या पुढाकाराने व रमेश धनगर, गोपाळ कुंभार, वत्सल शहा, रोहित सोनार, यतीन पवार, उमेश सोनार, सेवक हिंदुजा, संजय गोलेच्छा, जितेंद्र बडगुजर, हार्दिक खिलोसिया, महेंद्र राजपूत, दिलीप पाटील, भिकुबाई पाटील, सुनिल शिंपी, चंद्रकांत मोरे यांचेसह गोक्षेत्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व असंख्य तरुण युवा कार्यकर्ते परिश्रम घेेत उपक्रम यशस्वीपणे राबवित आहेत. विविध भागांतील नगरसेवक संजय पाटील, डॉ.राजेंद्र पिंगळे, राजेंद्र यादव, बापू झुलाल पाटील, भरत महाजन, योगेश शेटे, सुभाष भोई, गोविंदा महाजन यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांचेही सहकार्य लाभत आहे.

प्रांताधिकारी यांनी केली पाहणी

प्रांताधिकारी सिमा अहिरे यांनी प्रत्यक्ष रुबजी नगर येथील अन्नक्षेत्र उपक्रमा अंतर्गत सुरू असलेल्या केंद्राला भेट देऊन सोशल शासन निर्देशानुसार नियमांचे कटाक्षाने पालन होते आहे की नाही याबाबत पाहणी करून कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात. यावेळी नगरपालिकेचे चे अधिकारी संजय चौधरी, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!