इन्सिडंट कमान्डर तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती सिमा अहिरे यांचा आदेश

अमळनेर : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रासह जळगांव जिल्ह्यामध्ये होत आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोगप्रतिबंधक कायदा १८९७ लागू करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच अमळनेर शहरात कोरोना संसर्ग संशयीत रुग्ण नसले तरी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी संदर्भिय क्र.४ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, अमळनेर भाग यांची कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपोदघातातील अनुक्रमांक १, २ व ३ अन्वये इन्सिडंट कमान्डर म्हणुन नियुक्ती केलेली आहे.
उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती सिमा अहिरे यांनी इन्सिडंट कमान्डर म्हणून नियुक्ती नंतर आदेश जारी केले आहेत. आदेशात म्हटले आहे की, अमळनेर उपविभागातील अमळनेर व चोपडा तालुक्यातील सर्व संबंधीत नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. तसेच असे मास्क मानांकित प्रतीचे अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले, योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जुतूक करुन पुन्हा वापरता येण्याजोगे अथवा रुमालाने तोंड झाकणे आवश्यक राहील. जर सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द साथ रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८०७ चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी व संबंधीत व्यक्तीकडून रक्कम रु. ५००/- दंड वसुल करून तो मा. मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-१९ यासाठी जमा करणे बंधनकारक राहील. या आदेशाची प्रत प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.