पांझरा नदी काठावरील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यवाहीस योग्य सहकार्य करण्याचे आवाहन

अमळनेर : अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाण्याचे पहिले आवर्तन साधारणत: १५ एप्रिल च्या अगोदर मिळत असते. त्यामुळे अमळनेर, धुळे तसेच शिंदखेडा तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई पासून मुक्ती मिळते. याबाबत आमदार स्मिता वाघ यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेवून पाठपुरावा केला. या भेटीत पांझरा नदी काठावरील अमळनेर, धुळे तसेच शिंदखेडा तालुक्यातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेल्या अक्कलपाडा प्रकल्पाचे पहिले आवर्तन येत्या दोन तीन दिवसात मिळणार असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
यंदा आवर्तन मिळण्यासाठी जळगांव जिल्हा परिषदेचा आवश्यक प्रस्ताव जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे पाठविला गेला. तेथून प्रस्ताव धुळे जिल्हा प्रशासनाकडे रवाना करण्यात आला होता. धुळे जिल्हा परिषदेला प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे आवर्तन मिळण्यास उशीर होत होता ही बाब लक्षात घेवून आमदार वाघ यांनी धुळे जिल्हा परिषदेचे सभापती बापू खलाणे यांच्या माध्यमातून तातडीने आवश्यक प्रस्ताव धुळे जिल्हा प्रशासनास सादर केला असून तांत्रिक अडचण दूर झाली आहे. याबाबत आ.स्मिता वाघ व धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती बापूसाहेब खलाने यांनी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव व निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांची भेट घेवून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली. नदीवरील स्थित बंधाऱ्यावरील पाट्या काढण्याचे काम येत्या दोन दिवसात करण्यात येणार असून त्यानंतर आवर्तन सोडण्यात येणार आहे. पांझरा नदी काठावरील नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यवाहीस योग्य सहकार्य करुन आवर्तनाचे पाणी पांझरा-तापी संगमापर्यंत पोहचू द्यावे असे आवाहन आमदार स्मिता वाघ यांनी केले आहे. यावेळी धुळे जि.प. कृषी सभापती बापूसाहेब खलाणे व माजी पं.स. सभापती डॉ. दिपक पाटील उपस्थित होते.