कोरोना साथीत वृद्धांनी कोणताही आजार अंगावर न काढता सरकारी दवाखान्यात संपर्क करावा : डॉ.अनिल शिंदे

अमळनेर : लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर गोर गरीब लोकांना जेवण देण्यासाठी गोक्षेत्र प्रतिष्ठाण सोबत नर्मदा मेडिकल फाउंडेशन ने पुढाकार घेत एक दिवसाचे अन्नदान केले. यासोबत डॉ.अनिल शिंदे यांनी लोकांना कोरोनाबाबत मार्गदर्शन करतांना “कोरोना साथीत विशेषतः वृद्धांनी कोणताही आजार अंगावर न काढता त्वरित सरकारी दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन केले.
शहरातील मोल मजुरी करणाऱ्यांवर कोरोना मुळे लॉकडाऊन काळात भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आलेली असताना वर्धमान संस्कार धाम, गौक्षेत्र प्रतिष्ठाण च्या भानूबेन शाह हजारो लोकांना अन्नदानासाठी पुढे सरसावल्या. गौक्षेत्र प्रतिष्ठाण सोबत नर्मदा मेडिकल फाऊंडेशनचे डॉ.अनिल शिंदे, सौ.दिपाली शिंदे, डॉ.संदीप जोशी, डॉ.मयुरी जोशी यांनी एक दिवसाचे अन्नदान करुन मदतीचा वाटा उचलला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रुबजी नगर येथील अन्नक्षेत्र केंद्रावर डॉ.अनिल शिंदे यांनी सपत्नीक अन्नदान केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, संदीप घोरपडे, रणजित शिंदे, सुभाष भोई आदी उपस्थित होते. अन्नदानासाठी शहराच्या विविध भागांतील गरजू कुटुंबातील लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी शहरातील दाते गौशाळेतर्फे सुरू असलेल्या या अन्नक्षेत्र समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन योगदान देत असल्याने या संकटकाळी गोरगरीबांच्या जेवणाची सोय होत आहे. विविध क्षेत्रातील दात्यांनी असाच पुढाकार घेऊन अन्नदानासाठी सहकार्य करत राहावे असे आवाहन गौशाळेतर्फे चेतन शाह, राजू सेठ, प्रा.अशोक पवार, महेंद्र पाटील, डी.ए.धनगर यांनी केले आहे.