सील केलेल्या मुंगसे, सावखेडा, दापोरी आणि रुंधाटी गावातील नागरिकांना तीन दिवस घराबाहेर न पडता स्वतःची व आरोग्याची काळजी घेण्याचे केले आवाहन

अमळनेर : तालुक्यातील मुंगसे येथील महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासन लगेचच सतर्क झाले. रात्री बैठक घेवून मुंगसे गावासह आसपासचे सावखेडा, दापोरी आणि रुंधाटी अशी एकूण चार गावे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच प्रशासन सतर्क झाल्याने चारही गावात प्रशासन गतीने काम करू लागले. या अनुषंगाने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मुंगसे, सावखेडा, दापोरी आणि रुंधाटी या चारही गावांना भेट देवून तेथील गावकऱ्यांना धीर दिला. याशिवाय पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा, कोरोना सुरक्षेसाठी कोरोना प्रतिबंधक किट आहे की नाही ? याशिवाय कशाची कमतरता आहे याबाबत माहिती जाणून घेतली. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी सॅनिटायझर, मास्क, हेड मास्क किट आहे की नाही? याबाबतही चौकशी केली.
कोरोनाच्या भीतीने सील केलेल्या मुंगसे, सावखेडा, दापोरी आणि रुंधाटी या चारही गावातील नागरिक भयग्रस्त झाले असल्याने आमदार अनिल पाटील यांनी सरपंच, पोलीस पाटील, कर्मचारी वर्ग व नागरिकांना सोशल डिस्टनसिंग पाळत सूचना केल्या. नागरिकांनी तीन दिवस घराबाहेर न पडता स्वतःची, आरोग्याची काळजी घ्यावी व घरातून बाहेर पडून प्रशासनावर ताण निर्माण होणार नाही असे वागण्याचे आवाहन केले. आमदार पाटील यांनी सध्या काय दक्षता घेतली जात आहे याची स्वतः पाहणी करीत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत कुलकर्णी, डॉ.संजय पाटील, डॉ.शिल्पा बोरसे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्याकडून तेथील गावांचे सर्वेक्षण सुरू असून गावातील सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची यादी तयार करण्यात येत आहे.