वाहतूक बंद करुन नव्याने बांधकाम करणेसाठी आजी माजी आमदारांनी पुढाकार घ्यावा : रामभाऊ संदानशिव

अमळनेर : वर्षभरापुर्वी जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शहराचा जीर्ण झालेला पुरातन असा दगडी दरवाजाचा बुरुज ढासळला. संरक्षण म्हणून त्याला तात्पुरत्या स्वरुपात मुरुमाच्या गोण्या लावण्यात आलेल्या होत्या. दरम्यान, दरवाजाच्या बुरुजाभोवती लावलेल्या या मुरुमाच्या गोण्याही जीर्ण झाल्यामुळे आज सकाळी ढासळल्या. सध्या लॉकडाऊन असल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्र्वभूमीवर आमदार अनिल पाटील, मा.आमदार साहेबराव पाटील, प्रांताधिकारी सिमा अहिरे, न.प.च्या मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदार अनिलदादा पाटील यांनी नाशिक विभागीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे ही बाब निदर्शनास आणून देत निधीची मागणी मंजूर करुन घेतली होती. परंतु लालफितीचा कारभार व कोरोना प्रादुर्भावामुळे ऐतिहासिक दगडी दरवाजा दुरुस्तीची प्रक्रीया थांबली. सदर दरवाजाचे अवलोकन केले असता, दरवाजाच्या आतील दगडी कमानीलाही तडा गेला आहे. यामुळे पुरातन व शहराची अस्मिता टिकवणेसाठी दरवाजाचे दोन्ही जीर्ण बुरुज काढुन त्याठिकाणी नवीन बांधकाम करणेत यावे. यासाठी शासनाच्या अनुदानाची वाट न पहाता, आजी माजी आमदारांनी पुढाकार घेऊन नगरपरिषद आणि लोकवर्गणीतुन सदर दरवाजाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे. त्यासाठी आमदार अनिल पाटील, मा.आ.साहेबराव पाटील, आमदार स्मिताताई वाघ व इतर नेते मंडळीने पुढाकार घ्यावा. तसेच जिल्हाधिकारी यांचेकडुन नगरोत्थान योजना, वैशिष्ट्येपुर्ण योजना अथवा दलितेत्तर योजनेतील शिल्लक रकमेतुन तातडीने अनुदान मंजुर करणेबाबत पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे माध्यमातुन प्रयत्न करावा. अशी मागणी येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परीषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव यांचेद्वारा करणेत आली आहे.