हे युध्दच वेगळे..!

आता.. स्वत:ला व कुटुंबाला जपा, जबाबदार नागरिक व्हा !

चीनमधील वुहान मध्ये गेल्या वर्षात अदृश्य कोरोना विषाणूने जन्म घेतला आणि बघता बघता संपूर्ण देशभर थैमान घातले. अमेरिका, इटली, इंग्लंड, जर्मनी या सारखे प्रगत राष्ट्रदेखील आज या विषाणू मुळे हतबल झालेत. उशिरा का होईना या विषाणूने भारतातही विविध राज्यात पाऊल टाकले. सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली. देशभर ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’ चा संदेश दिला गेला. भारतात २३ मार्च पासून लॉक डाऊन जाहीर झाला. लॉकडाऊन च्या सुरवातीला कोरोनाचे भय प्रत्येकाच्या मनात होते. नागरिक केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडत होते. जस जसा काळ पुढे सरकला तस तसे नागरिकांच्या घराबाहेर पडणाऱ्या पाऊलांमध्ये वाढ दिसायला लागली. मुल चुकले तर दोन धबके देतो वा रागावतोच ना आपण ? परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे आले. प्रसंगी प्रशासनाने कठोर पाऊले उचलली. पोलीस प्रशासनाने आपला दंडुकी हिसका दाखवल्यावर काहींनी पोलीस प्रशासनावरच ताशेरे ओढले. त्या दंडुकी हिसक्यामागे शिस्तीबरोबर धाक होता. पोलीस यंत्रणेकडून एखाद्या निरपराध व्यक्तीवर दंडुका पडलाही असेल पण.. कोणती व्यक्ती कोण ? हे त्यांना काय माहीत असणार. शेवटी पोलीसांनी सौम्य शिक्षा देण्यास सुरुवात केली. यामुळे जसा सुरुवातीला पोलीस यंत्रणेचा धाक होता तो पुढे काहीसा कमी झाला. साहजिकच लॉक डाऊन च्या दरम्यान अत्यावश्यक सेवेच्या नावाने शहरातील नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा ओघ वाढतांना दिसला. काही अति हुशारांनी मॉर्निंग वॉक, ईव्हिनिंग वॉक ची कारणे दाखविली. सुरुवातीला काहींनी समाजसेवेचे सोंग घेतले पण ते फोटोपुरते. हे समाजसेवक कालांतराने दिसलेही नाही. अनेक जण मुंबई, पुणे शहरांतून गावी परत आले पण त्याची माहिती प्रशासनाला वेळीच कळविली गेली नाही. शासनाने गरीब गरजूंना मदतीसाठी चांगल्या हेतूने मोफत योजना जाहीर केल्या. सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी दिवसेंदिवस वाढत गेली. येथेच आपण कोरोनाच्या विळख्यात सापडलो. तेव्हापासून कोरोना विषाणूचा संंसर्ग वाढला आणि वाढतोच आहे.

अमळनेरकरांसाठी चिंतेची बाब..! जिल्ह्याचा धोका वाढतोय

जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात एक अंकी असलेले कोरोना बाधित रुग्ण आज (९ मे ) रोजी १५७ वर जाऊन पोहचलेत. साहजिकच जिल्ह्याचा धोका वाढतो आहे. या चार दिवसात तर जळगाव जिल्ह्यात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत मोठी वाढ दिसून आली. अमळनेर शहरात या चार दिवसात ७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आज मितीला जिल्ह्यातील १५७ पैकी १०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणजेच ६४ टक्के रुग्ण अमळनेर तालुक्यातील आहेत. त्या पाठोपाठ भुसावळ २१, पाचोरा १५, जळगाव १४ आणि चोपडा ५ असा क्रमांक लागतो. अमळनेरकरांसाठी ही चिंतेचीच बाब आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. या मागचे कारण प्रत्येकाने शोधणे गरजेचे आहे. प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून विचार करणे गरजेचे आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यावर लक्ष ठेऊन अहोरात्र कार्य करीत आहेत. परंतु जिल्ह्यात कोरोनाच्या या वेगाने होणाऱ्या फैलावाचे शास्त्रीय कारण शोधणे देखील काळाजी गरज आहे. परंतु आणखीन सुप्तावस्थेत कोरोनाचे रुग्ण असू शकतात आणि हे रुग्ण कोरोना संसर्गास कारणीभूत ठरुन तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढू शकते. इतर तालुक्यातील रुग्ण जिल्हा स्तरावर इतर आजारांसाठी खाजगी रुग्णालयात येत असतात. लक्षण नसल्याने ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत किंवा नाही हे सांगता येत नाही त्यामुळे जिल्हा स्तरावर कोरोना विषाणू एका तालुक्यातील संशयित कोरोना रुग्णांकडून इतर तालुक्यातील रुग्णांकडे संक्रमित होऊ शकतो. तालुका सीमित या कोरोनाचा अन्य तालुक्यात शिरकाव होऊन अचानक उद्रेक होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने आता मात्र सर्वांना समान न्यायाने कठोर भूमिका घ्यायलाच हवी.

कोरोनाबाधित परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजिक संस्था यांचे मदतीने पोहचविणे गरजेचे आहे. विना पास घराबाहेर फिरणे बंद झाले पाहिजे. प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून आपल्या काही हक्कांसाठी काहीशी सूट दिली याचा अर्थ कोरोना चे सावट संपले असा होत नाही. आपण जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य विसरून चालणार नाही. गेल्या दोन दिवसात बंद असलेली काही विशिष्ट दुकाने उघडल्याने सोशल डिस्टनसिंग चा तर फज्जा उडाला. कोरोना चे गांभिर्य कोणी घेतलेले दिसत नाही व ते योग्यही नाही. अशातच हा विषाणू आता आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे याचे भान आपण ठेवणे गरजेचे झाले आहे. जर का या विषाणू चा उद्रेक जिल्हाभर मोठ्या प्रमाणात झाला तर मात्र आरोग्य यंत्रणेचा ताण नक्कीच वाढणार आहे. उपलब्ध परिस्थितीत आरोग्य सेवेतील कर्मचारी आपली सेवा बजावतील. या दरम्यान एकही डॉक्टर, नर्स दोन आठवड्यासाठी विलगिकरण कक्षात गेले किंवा दुर्दैवाने त्यांना काही ईजा झाली, तर ते आपल्याला परवडणारे नाही. कारण हे युद्ध वेगळे आहे. आपल्याला आहे त्या शासकीय, खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हे युद्ध लढायचे आहे आणि लवकर जिंकायचे देखील आहे. कारण युद्ध उशिरा जिंकून फायदा नसतो. मुंबईत कोरोना विषाणू ने पुढचा टप्पा गाठला आहे. सर्व डॉक्टर सेवा देतीलही पण आपण शासनाचे निर्देश पाळले नाही तर आपली स्थिती देखील मुंबईकरांसारखी होईल. कोरोना उंबरठ्याबाहेर वाट पहातोय..! म्हणूनच आता.. घरातच थांबून स्वत:ला व कुटुंबाला जपा, जबाबदार नागरिक व्हा !

संजय सूर्यवंशी, संपादक -दिव्यचक्र.

Share this news:

2 thoughts on “हे युध्दच वेगळे..!

  1. सरजी खरोखरच उपय़ुक्त माहीती दिव्यचक्र च्या माध्यमातुन आम्हाला मिऴत असते,हे दिव्यचक्र तर आहेच पण माझ्या मते हे सत्यचक्र आहे धन्यवादंंंंंंंं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!