ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या महिलांची प्रसूती खाजगी रुग्णालयात करण्यास स्त्रीरोग तज्ज्ञांचा होकार

अमळनेर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दाखल करून त्यांच्यावर तेथेच उपचार करण्याचा निर्णय झाल्याने ग्रामीण रुग्णालयात होणाऱ्या सामान्यांच्या प्रसूती कोठे करायच्या ? असा प्रश्न निर्माण झाला होता. आमदार अनिल पाटील यांचे उपस्थितीत काल सकाळी ग्रामीण रुग्णालयात घेतलेल्या बैठकीत आवाहन केल्यानंतर स्थानिक स्त्रीरोग तज्ज्ञ यांनी राजीखुषीने आपल्या रुग्णालयात या सर्व प्रसूती मोफत करण्याचा निर्णय घेतल्याने सामान्य कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.भूषण पाटील, डॉ.प्रसन्ना जोशी, डॉ.संजीव चव्हाण, डॉ.रवींद्र जैन, डॉ.मयुरी जोशी, डॉ.स्वप्ना पाटील, डॉ.अंजली चव्हाण, डॉ.मंजुश्री जैन यांसह कर्मचारी उपस्थित होते.
अमळनेर शहरात कोविड १९ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने संशयित व बाधित रुग्णांना अमळनेर येथेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आहे. विशेष म्हणजे संशयितांचे स्वॅब देखील अमळनेर येथेच घेतले जात आहेत, यासाठी प्रताप महाविद्यालयात महिला वसतिगृहात कोविड केअर सेंटर केले असून संशयित रुग्णांना या ठिकाणी व जे बाधित असतील त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात करावे असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयात दरमहा असंख्य गोरगरीब कुटुंबातील महिलांची प्रसूती होत असते. ग्रामीण रुग्णालयात संपूर्ण कोविड रुग्ण ठेवल्यास महिलांची प्रसूती याठिकाणी कशी करावी ? असा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताडे व डॉ.जी.एम.पाटील यांनी आ.अनिल पाटील व प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्याने यावर मार्ग काढण्यासाठी आमदारांनी तात्काळ स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या बैठकीचे आयोजन करून त्यांनी त्यांच्या रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या महिलांची प्रसूती करावी त्यांना त्यासाठी लागणाऱ्या सर्व औषधी ग्रामीण रुग्णालयामार्फत पुरविल्या जातील मात्र या आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी प्रशासनास मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर सर्व डॉक्टरांनी तात्काळ होकार देत सामान्य प्रसूती असो अथवा सिझरिंग आम्ही सर्व प्रकारच्या प्रसूत्या आमच्या रुग्णालयात मोफत करू अशी ग्वाही दिली. आज देशावर संकट असताना आपल्या भूमीत मदतीसाठी पुढे येणे हे आमचे कर्तव्यच असून आम्ही आनंदाने हे सेवाकार्य करू अशी भावना डॉ.भूषण पाटील, डॉ.प्रसन्न जोशी व डॉ.मयुरी जोशी यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात आ.अनिल पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, अमळनेर येथील सर्व तज्ञ डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद असून सुरुवातीपासून या कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले योगदान देत आहेत. सुरुवातीला सानेगुरुजी शाळेतील शिबिरात सर्व एम डी डॉक्टर्सनी मोफत दहा दिवस योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक बैठकीस आवाज देताच ते उपस्थिती व मार्गदर्शन करीत आहेत. या धोकेदायक स्थितीतही त्यांनी आपले दवाखाने सुरू ठेऊन रुग्णांची परिस्थिती पाहून सेवाकार्य सुरू ठेवले आहे. आता अत्यंत नामांकित असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी देखील पुढे येत मोफत सेवेची तयारी दाखविल्याने ग्रामीण रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचाराचा मोठा प्रश्न सुटला आहे.