स्वत:चे व कुटुंबाचेच नव्हे तर आपल्या ग्राहकांचे कुटुंब सुरक्षित राहावे याची घेतली जाते काळजी

अमळनेर : देशभर कोरोना ने थैमान घातल्याने ‘मीच माझा रक्षक’ या ब्रीदनुसार प्रत्येक जण आपली सुरक्षा करीत आहे. अशातच दूध विक्रेत्यांकडून घरोघरी सुरक्षा म्हणून दूध वाटपासाठी अनोखी शक्कल लढविली जात आहे. तालुक्यातील लोण येथील भटू पाटील हे दररोज अमळनेर शहरात येवून ठरलेल्या ग्राहकांना घरपोच दूधाचे वाटप करतात. ग्राहक हा देव मानून अशा खडतर प्रसंगी देखील त्यांनी आपला दुग्ध व्यवसाय प्रामाणिकपणे सुरु ठेवला आहे. दूध वाटपासाठी सुरक्षा म्हणून त्यांनी प्लास्टिकचा अर्धा इंची सुमारे चार फूट पाईप, दोन एल्बो व नरसाळे चा वापर करुन सोशल डिस्टन्सिंग साठी अनोखा पर्याय निवडला आहे. आपल्या दुचाकीला हे यंत्र बांधून घेतले आहे. त्याद्वारे दूध ग्राहकाला दूधाचे वाटप केले जात आहे. या यंत्रासाठी त्यांना सुमारे १५० रुपये खर्च आला आहे. यासोबत मास्क अथवा हातरुमाल नाक व तोंडाला बांधणे, सोबत सॅनिटायझरचा वापर ते करीत आहेत.
याबाबत भटू पाटील यांचेकडून माहिती जाणून घेतली असता, त्यांचे स्वत:कडे शेतीसह काही म्हशी आहेत. त्यासोबत परिसरातील काही दूधही संकलित करतात. या कामात त्यांचे वडील व भाऊ विनोद मदत करतात. स्वत:चे व कुटुंबाचेच नव्हे तर आपल्या ग्राहकांचे कुटुंब सुरक्षित राहावे याची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. ग्राहक सुखी तर आम्ही सुखी राहू असे ते सांगतात. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.