
अमळनेर : अमळनेर शहर व तालुका राजपूत एकता मंच तर्फे शासन निर्देशाचे पालन करत वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४८० वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. शहरातील महाराणा प्रताप चौकातील स्मारकावर केवळ पंच मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्मारकावरील प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करण्यात आले.
राजपूत एकता मंचतर्फे दरवर्षी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक तसेच विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते. परंतु यावेळी कोरोना लॉकडाऊन मुळे सर्वच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध आले असल्याने शासन आदेशाचा सन्मान राखत सर्व मोठे कार्यक्रम राजपूत एकता मंचने रद्द केले. ग्रामीण आणि शहरी भागातील समाज बांधवांना आपापल्या घरीच महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे आवाहन केले होते. पूजनावेळी राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, अनिल पाटील, अजयसिंग पाटील, विलास पाटील, गुलाबसिंग पाटील, चेतन राजपूत, प्रवीण पाटील तसेच प्रा.किरण पाटील, जयेश पाटील, भटेश्वर वाणी, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.