जगाचा पोशिंदा लुटीच्या दुष्टचक्रातून बाहेर निघावा यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी करताहेत पाठपुरावा

जिल्हाधिकारी यांचेकडे पत्राद्वारे केली कार्यवाहीची मागणी

अमळनेर : कोरोना महामारीमुळे सर्व जग धायकुतीस आलं आहे. त्यातच सतत अवर्षणप्रवण व दुष्काळाशी सामना करत असलेला तालुक्यातील शेतकरीवर्ग पार कोलमडून पडला आहे. अशाही स्थितीत शेतकरी हितासाठी काम करत असणारी बाजार समिती संचालक मात्र “शेतकरी हित” गठाणीत बांधत बाजार समिती टोकण पद्धतीत तर प्रत्यक्ष मोजणी ठिकाणी सीसीआय कटती करत झोल करत आहे. या सर्वच प्रकारांची चौकशी होऊन दोषींना शासन व्हावे आणि पोशिंदा लुटीच्या दुष्ट चक्रातून बाहेर निघावा यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी पाठपुरावा करत आहेत. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडे पत्राद्वारे ठोस कार्यवाहीची मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून लामा जिनींग मध्ये सी.सी.आय. (कॉटन फेडरेशन) मार्फत कापुस खरेदी सुरु करण्यात आली आहे. सदरहु खरेदी सुरु असतांना कापुस मोजमाप करतांना शेतकऱ्यांच्या कापसाला प्रती क्विंटल मागे ५ ते ७ किलो शासनाचे कुठलेही निर्देश नसतांना कटती लावली जात आहे. सदर कटतीमुळे क्विंटल मागे सुमारे ३५० ते ४०० रु. प्रमाणे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सदरहु कापुस कटतीसाठी कापुस विक्रीस आलेल्या मजबुर शेतकऱ्यांवर दबावतंत्राचा वापर करुन ही लुटमार सर्रास सुरु आहे. सदर लुटमार ही कोणाच्या संगनमताने सुरु आहे अथवा केली जात आहे या बाबत सविस्तर चौकशी करण्याची गरज आहे. तसेच खरेदी प्रक्रीयेची नोंदणी व टोकण अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे देण्यात येत आहेत. परंतु सदर बाजार समिती मार्फत नोंदणीकृत शेतकऱ्यांची यादी फक्त नावालाच असून या नोंदणीकृत शेतकऱ्यांना देण्यात येणारे टोकण आर्थिक लाभापोटी आपल्या लाभातील व्यापाऱ्यांना सदर टोकण ५००० ते १०००० रु.प्रमाणे विकले जात आहे. यात मुळ कापुस विक्रेता शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. अशी तक्रार कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे वरील लाभापोटी झालेल्या नोंदणी प्रक्रीयेची व कापुस मोजमापात होणाऱ्या लुटमारीची कटती मार्फत आर्थिक फसवणुक होत असून त्याची चौकशी करुन चौकशी अंती मिळून आलेल्या दोषीवर गुन्हा दाखल करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा व सुरुवातीला नोंदणी झालेली शेतकरी यादी व वाटप केलेल्या टोकणांच्या यादीत तफावत असल्याने वरील दोन्ही याद्या माझ्या माहितीस्तव उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच यापुढे कापुस, मका व ज्वारी खरेदी संदर्भात प्रक्रिया राबवुन गावात व शेतकऱ्यांच्या घरी जावून कृषीसहाय्यक , तलाठी, ग्रामसेवक अशा शासकिय अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्यासाठी पाठवून जे खरे कापुस, मका व ज्वारी उत्पादक शेतकरी आहेत यांची नोंदणी करुन टोकण देऊन कापुस, मका व ज्वारी खरेदी करावी व अशा शेतकऱ्यांची यादी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फलकावर तसेच तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाकडे प्रसिध्दीस सादर करावी. अशी मागणी मा.आ.शिरीष चौधरी यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे केली आहे. अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनाही या पत्राची प्रत देण्यात आली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!