कामगार नेते रामभाऊ संदानशिव यांचे निधन; दलित शोषितांचा आधारवड हरपला

अमळनेर : येथील ज्येष्ठ कामगार नेते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ शंकर संदानशिव (अण्णा) यांचे काल ता.२८ रोजी दुपारी जळगाव येथे रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी ते ७२ वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. दोन दिवसापूर्वी श्वसनाचा त्रास जाणवल्याने त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे अचानक जाण्याने तालुक्यातील चाहते व मित्र परीवाराला धक्का बसला. कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांचेवर अमळनेरला अंत्यसंस्कार करण्याची परवानगी न मिळाल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जळगाव येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

जीवनाच्या प्रवासास त्यांनी गरिबीतून सुरुवात केली. कामगार, कामगार नेता, पत्रकार, राजकारणी, समाजकारणी असा त्यांचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. नगर परिषदेत कर्मचारी म्हणुन सेवा दिल्याने नगर परिषदेची इत्यंभूत माहिती त्यांना होती. नगर परिषदेचे कोणतेही काम सहजतेने करण्याची त्यांची हातोडी होती. सामाजिक आंदोलनातलं नाव म्हणजे रामभाऊ अण्णा. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. न.प.कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक होते. दलित शोषितांसाठी त्यांचे काम कायम स्मरणात राहील. यामुळे दलित शोषितांचा आधारवड हरपला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात आई, चार मुले, सुना, एक मुलगी, जावाई व नातवंडे असा परिवार आहे. अमळनेेर न.प.चे नगरसेवक नरेंद्र संदानशिव उर्फ राजूभाऊ यांचे ते वडील होत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!