आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते मका व ज्वारी शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ

शेतकऱ्यांना पीक पेऱ्याच्या नोंदीनुसार मक्याला हेक्टरी ५४ क्विंटल आणि ज्वारी ला हेक्टरी १९.५ क्विंटल मर्यादा

अमळनेर : येथील मका व ज्वारी शासकीय खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. तीनशे शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून टप्प्या टप्प्याने शेतकरी बोलावण्यात येणार आहेत. शासकीय भरडधान्य ज्वारी, मका रब्बी हंगाम २०१९-२० अंतर्गत १५१४ शेतकऱ्यांचे कागदपत्रे जमा करण्यात आले असून तीनशे शेतकऱ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. गोदाम नसल्याने खरेदी होत नव्हती मात्र, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तात्पुरते शेतकी संघाचे २ हजार क्विंटल क्षमता असणारे गोदाम उपलब्ध करून दिले. यामुळे २९ मे रोजी सकाळी ११ वाजता आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करून मका व ज्वारी खरेदी शुभारंभ करण्यात आला.

गोवर्धन येथील प्रथम शेतकरी अनिल निंबा पाटील यांचाही आमदार पाटील यांनी सत्कार केला. त्यांचा ६० क्विंटल मका मोजण्यात आला. यावेळी बाजार समिती संचालक विजय प्रभाकर पाटील, एल.टी.पाटील, शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील, नायब तहसीलदार संतोष बावणे, नायब तहसीलदार आर.डब्ल्यू.महाडिक, पुरवठा अधिकारी नाना पाटील, कर्मचारी सुभाष पाटील, भिकन पवार हजर होते. दरम्यान, शासनाकडे बारदान नसल्याने देखील खरेदी करण्यास अडचण होती. अखेर महसूल अधिकाऱ्यांनी १८० दुकानदारांकडून प्रत्येकी १०० बारदान मागविले आहेत. शेतकऱ्यांना पीक पेऱ्याच्या नोंदणीनुसार मक्याला हेक्टरी मर्यादा ५४ क्विंटल आणि ज्वारी ला हेक्टरी १९.५ क्विंटल मर्यादा आहे. बारदान उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांना ऑनलाईन संदेश देऊन बोलावण्यात येईल. त्यानुसारच शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणावा असे आवाहन शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!