कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेची निराशा करणारा रविवार
अमळनेर : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सीसीआय मार्फत शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेची निराशा करणारा रविवार उजाडला. कापूस खरेदी केंद्र असलेल्या लामा जिनिंग ला आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भिषण आग लागून हजारो क्विंटल कापूस जळून खाक झाला. पणन संघाने दि.२७ पासून कापूस खरेदी थांबविली होती. आजही रविवार असल्याने कापूस खरेदी बंद होती. सकाळच्या वेळी काही तरुण ढेकू रोडवर मॉर्निंग वाक करीत असतांना त्यांना घटनास्थळी धूराचे लोट निघतांना दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती तत्काळ संबंधितांना कळविली. जिनींगचे आत दोन खाजगी वाहने अडकली होती ती वाहने तरुणांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच जिनींगचे संचालक जितेंद्र कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, नगरसेवक विवेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी बोलावून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु झाले. आगीने रौद्र रुप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. मदतीसाठी काही खाजगी टॅंकर्सही बोलावण्यात आले. अमळनेर नगर परिषदे शिवाय चोपडा, धरणगाव, पारोळा, धुळे येथूनही अग्निशमन बंब मदतीसाठी पाचारण करुन शर्थीचे प्रयत्न झालेत. सुमारे चार तास उलटूनही आग आटोक्यात आली नव्हती. आग कशामुळे लागली ? याचे कारण अद्याप कळाले नाही. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवून आमदार स्मिताताई वाघ, तहसीलदार मिलींद वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार, संचालक पराग पाटील यांनी परिस्थिती ची पाहणी केली. दि.२६ मे अखेर या केंद्रावर चारशे टोकण धारकांकडून कापूस खरेदी झाल्याचे कळते. या आगीमुळे पुढील टोकण घेतलेले कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेची सध्या तरी निराशा झाली आहे.