
अमळनेर : तरुणाई सध्या डिप्रेशनमध्ये असून पालकांनी उपदेशाचे डोस न देता, त्यांचेसोबत मित्राची भूमिका निभवावी. आजच्या तरुणाईला संस्कार व आधाराची गरज असल्याचे मत डॉ. प्रा. राजेश मिरगे, अमरावती यांनी व्यक्त केले. येथील पुज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात व्याख्यानमालेच्या समारोपावेळी ” तरूणाई आहे तरी कुठे ?” या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कै.प्रा.श्रीमती पद्माबाई तेजस्वी निजसुरे व प्रा.टी.एच.बारी यांनी आपल्या नातेवाईकांच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून दरवर्षी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्यासपीठावर व्याख्याते डॉ. प्रा. राजेश मिरगे यांचेसह प्रमुख पाहुणे म्हणून सानेगुरुजी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंग पवार, वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, चिटणीस प्रकाश वाघ होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुज्य सानेगुरुजी यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय डॉ. माधुरी भांडारकर, अँड रामकृष्ण उपासनी यांनी केला. वाचनालयातर्फे मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
डॉ.मिरगे पुढे म्हणाले की, खेळावे त्या वयात सानेगुरुजी, महात्मा गांधी, बाबा आमटे यांनी आपले रक्त सांडले. त्यांचे विचार आपण विसरत चाललो आहोत. सामाजिक चळवळी जेथे आहेत, तिथेच दिसतात, त्या पुढे जात नाही. सध्या घराघरात तरूणाईचे संस्कार हरवले आहेत. आजच्या तरूणाई वर्गाला फक्त उपदेशांचे डोस दिले जातात. आधी केले.. मग सांगितले या उक्तीप्रमाणे वागले पाहिजे. सध्या तरूणाई सण उत्साहात डिजेच्या तालावर नाचू लागली आहे. बाबा आमटे, सानेगुरुजी यांचे विचार ते कसे आत्मसात करतील ? अशी खंत डॉ. मिरगे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रा.डॉ एस.ओ.माळी, सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील, डी.ए.धनगर, सोपान भवरे, विकास ब्राम्हणकर, अशोक पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. माधुरी भांडारकर, कार्यकारणी सदस्य पी एन भादलीकर, भीमराव जाधव, सुमित धाडकर, ईश्वर महाजन, प्रसाद जोशी व वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले. वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार वाचनालयाचे सदस्य अँड रामकृष्ण उपासनी यांनी केले.