जिल्हातील सर्व सरपंच पदाधिकारी आक्रमक भुमिका घेतील असा पत्रकातून ईशारा

अमळनेर : जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.२४ जून २०२० रोजी पत्र काढून अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांचेकडील गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार काढून जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. बी. सोनवणे यांच्याकडे देण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. कसलीही अपेक्षा न ठेवता प्रामाणिक पणे काम करणारे गटविकास अधिकारी यांचा पदभार काढून घेतल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर संदीप वायाळ यांना गटविकास अधिकारी पदाचे अधिकार कायम ठेवण्याची मागणी सरपंच संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे नुकतीच पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत एकमेव अधिकारी संपुर्ण महाराष्ट्रात झपाटल्या सारखा फिरत होता. मागील वर्षी दुष्काळाशी सामना करतांना ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याचे उत्तम नियोजन केले. २२ मार्च पासून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले. संपुर्ण तालुक्यात संदीप वायाळ यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. सद्यस्थितीत म.ग्रा.रोहयो च्या कामांना सुरुवात झाली आहे त्यासाठी अनेक सरपंचाना योग्य सल्ला व मार्गदर्शन ते करीत आहेत. सर्व सरपंच सतत त्यांच्या संपर्कात असल्याने ग्रामीण भागातील जनतेला सन्मान व न्याय मिळत आहे. असे असतांना अचानक पणे या अधिकाऱ्याचा पदभार का काढण्यात आला ? हे तालुक्यातील जनतेला मोठे कोडे आहे. घरकुल योजनेतही अमळनेर तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. अशी अनेक विकास कामे जोमाने सुरु असतांना कसलीही लालसा न ठेवता प्रामाणिक पणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा पदभार काढणे किती न्यायिक ठरेल याचा वरिष्ठांनी विचार करावा. कामे चांगली होत असतांना अत्यंत कर्तव्य दक्ष असलेल्या अधिकाऱ्याकडून एखाद्या कामात त्रुटी राहु शकते. पण अचानकपणे अधिकार काढुन तालुक्यातील जनतेला दिशाहिन करणे ही बाब अत्यंत दुर्दवी व निंदनिय आहे. शिवाय ही बाब तालुक्याच्या विकासाला अडथळा आणणारी आहे. एका चांगल्या प्रशासकीय अधिकारी वर अन्याय होणार नाही यासाठी विशेष लक्ष घालावे. अन्यथा तालुक्यातील नव्हे तर जिल्हातील सर्व सरपंच पदाधिकारी आक्रमक भुमिका घेतील असा ईशाराही पत्रकातून देण्यात आला आहे. पत्रकावर सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंखे, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांच्यासह रामकृष्ण पाटील तळवाडे, सौ.उज्वला पाटील नगांव, दगडू सैदाणे धार, सुनील पाटील निंभोरा, पंकज राजपूत कळंबू, केदारसिंग जाधव हिंगोणा, दिनेश पाटील पिंपळे खुुर्द, अशोक पाटील भरवस, सौ.हर्षदा पाटील मंगरूळ, सुभाष पारधी पिंपळे, काशिनाथ माळी मुडी, प्रविण पाटील ब्राम्हणे यांचेसह अनेक सरपंच पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. ग्राम विकासमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री, अमळनेरचे आमदार यांनाही माहितीसाठी पत्र पाठवले आहे.
