एक लाख ग्रामीण मजुरांना रोजगार देण्याचा संकल्प

अमळनेर : महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातून १,५०,००० नागरिकांना अन्नधान्य, राशन किट, PPE कीट मास्क इतर साहीत्य वाटप केले आहे. कोरोना जन्य परिस्थितीत निर्माण झालेले संकट निवारण कार्यासाठी “आत्मनिर्भर भारत” अभियानात सर्व देश वासियांनी सहभागी व्हावे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच आवाहन केले आहे. या संकल्पनेत योगदान देण्यासाठी १ जाने २०२१ पर्यन्त रोजगार हमी ते ग्राम विकास प्रकल्प अंतर्गत १ लाख ग्रामीण कामगारांना रोजगार देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात १ जून पासून आज पर्यन्त ५०० गावांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सामाजिक संस्था व ग्रामीण कार्यकर्ता या सर्वांना रोजगार निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन देण्यासाठी ऑनलाईन झूम कॉल द्वारे रविवार, दिनांक ५ जुलै २०२० रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदर्श गाव समिती (महाराष्ट्र शासन) चे अध्यक्ष पोपटराव पवार, पुणे चे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र राज्य कृषी उपसंचालक अनिल भोकरे, नवापुर नंदुरबार चे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पाणी फाऊंडेशन प्रतिनिधी अविनाश पोळ, प्रगती अभियान च्या सौ.अश्विनी कुलकर्णी, खोज – मेळघाट च्या संस्थापक पोर्णिमा उपाध्याय, अफार्मचे माजी कार्यकारी संचालक एम.एन.कोंढाळकर, संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी नांदेड चे वसंत रावणगावकर आदी मान्यवर असणार आहेत. तरी कृपया ग्रामीण भागातून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी आपण झूम कॉल द्वारे सहभाग घ्यावा. असे साने गुरुजी फाऊंडेशन, अमळनेरचे अध्यक्ष तथा महा एन जी ओ फेडरेशन संयोजन समितीचे राज्य समन्वयक नरेंद्र पाटील यांनी कळविले आहे.