
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून कोरोनाबाधीतांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा ४ हजाराचा आकडा पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधींसह अनेक संघटनांकडून लॉकडाऊनची मागणी समोर येत होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करुन जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि.७ जुलैच्या पहाटे ५ वाजेपासून ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात औषधी दुकाने, दुधविक्री, खरेदी केंद्र सुरु राहणार आहेत. नागरिकांना रहिवास असलेल्या परिघातच अशा खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील. मात्र.. अशा खरेदीसाठी कोणत्याही स्वयंचलित वाहनाचा वापर करता येणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समिती चे किरकोळ खरेदी विक्री चे व्यवहार होणार नाहीत. ठोक / घाऊक खरेदी विक्री चे व्यवहार नियंत्रित पध्दतीत सुरु राहतील. मास्क, सॅनिटाईझर याबाबत दक्षता घेण्याची सर्व जबाबदारी बाजार समिती सचिव यांचेवर राहणार. ज्यांची शेती नमूद नगरपालिका क्षेत्राबाहेर आहे अशांना शेतीविषयक कामांकरिता ये जा करता येईल मात्र त्या व्यक्तीकडे शेतीचा ७/१२ उतारा सादर करणे आवश्यक राहणार आहे. वैद्यकीय उपचारासाठी रहिवास भागात डॉक्टर नसल्यास अत्यावश्यक गरजेवेळी तज्ज्ञ डॉक्टरकडे बाहेर जाता येईल. नमूद बाबी वगळता अन्य सर्व सेवा, आस्थापना, किरकोळ व होलसेल दुकाने, उद्योग व कंपन्या (एमआयडीसी वगळून) सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेत समावेश असलेले सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, बॅंका, वित्तीय संस्था, आपत्ती व्यवस्थानाशी संबंधित कार्यालये सुरु राहतील मात्र तेथील अधिकारी / कर्मचाऱ्यांना ओळख पत्र बाळगणे अनिवार्य राहील. लॉकडाउन लावण्यात आलेल्या क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांना फक्त अत्यावश्यक सेवांच्या व्यक्तींना पेट्रोल, डिझेल विक्रीची परवानगी आहे. लॉकडाउन काळात ५० व्यक्तींच्या मर्यादेस अधिन राहून लग्न समारंभ नियंत्रणात पार पाडता येतील. यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक राहील. २० व्यक्तींच्या मर्यादेस अधिन राहून अंत्यविधी करण्यास परवानगी आहे. सदरचा आदेश जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्रासाठी आहे.