अमळनेरला युरिया खतांची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड; माजी आमदार स्मिता वाघ यांची कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा

खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली मागणी

अमळनेर : कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरीराजा आधीच भरडला जात असताना ऐन पेरणीच्या काळात त्याची युरिया खतासाठी वणवण होऊन त्याला रांगा लावूनही खत मिळत नाही. खतांची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. या गंभीर प्रश्नी माजी आ स्मिता वाघ यांनी आवाज उठविला असून जिल्हा व तालुका कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अमळनेर परिसरात युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

यासंदर्भात निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ वर्षानंतर पुन्हा एकदा कृत्रिम खत टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आज तालुक्यातील शेतकरी युरीया व इतर खतांसाठी वणवण फिरत आहे. कृत्रिम खत टंचाई आघाडी शासनाचा पायगुण असून कृषी विभाग साठेबाजावर मेहरबान असल्याचे निदर्शनात आले आहे. वास्तवात २० दिवसांत युरिया व इतर आवश्यक खतांचा पुरवठा रेल्वेद्वारे तालुक्याला मिळाला आहे. परंतु तालुक्यात कृषी विभागामार्फत योग्य नियोजन न केल्यामुळे तालुक्यात आज खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होवून साठेबाज व कृषी विभागाच्या मेहरबानीमुळे वाढीव भावात खतविक्री करीत आहेत. तसेच गरज नसलेले वाढीव दरांचे खते घेण्याचे बंधन शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. यातून शेतकरी वर्गाची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. गेल्या ५ वर्षात भाजपाचा शासनाच्या कार्यकाळात एकदाही हंगामात खतांची टंचाई निर्माण झाली नव्हती तसेच वाजवी दरात खत उपलब्ध होत होते. परंतु या वर्षी कृषी विभागाच्या मेहरबानीमुळे साठेबाज यांचे चांगलेच फावले असून हंगामात शेतकरी खतांसाठी दारोदारी भटकत आहेत. तालुक्यातील खतांची मागणी व पुरवठा याचे गणित बिघडले असून आघाडी शासनाच्या पायगुणामुळे खतांच्या कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे ही निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६०० च्या वर गेली असून खते वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत असून यातून कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे. हंगामात शेतकऱ्यांना वाजवी दरात खत उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी असून तालुक्यातील शेतकऱ्यांना वाजवी दरात खते उपलब्ध होण्याबाबत आपल्या स्तरावरील कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी विनंती माजी आ.स्मिता वाघ यांनी केली आहे.

साठेबाजांवर होणार धाडसत्र सुरू

तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर माजी आ. स्मिता वाघ यांनी असंख्य शेतकऱ्यांसमक्ष जिल्हा कृषी अधिकारी शिंदे यांचेशी मोबाईल वर संपर्क साधून युरिया कृत्रिम टंचाईची कारणे विचारली. यावेळी तालुका कृषी अधिकारी वारे व अमळनेर पंचायत समितीचे कृषी अधिकारी अमोल भदाणे देखील उपस्थित असल्याने त्यांचेही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी श्रीमती वाघ यांची मागणी लक्षात घेता, उद्या पासून खतांचे साठे बाजार व जादा दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध धाड सत्र सुरू करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बंद असलेली मका खरेदीही सुरू करण्याची केली मागणी

अमळनेर येथील शासकीय मका व ज्वारी (भरड धान्य) खरेदी केंद्रात बंद असलेली मका खरेदी तात्काळ सुरु करण्याची मागणी देखील माजी आ स्मिता वाघ यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर येथील शासकीय मका व ज्वारी (भरड धान्य) खरेदी केंद्रात मका खरेदी गोदाम उपलब्ध नसल्याच्या कारणास्तव बंद असल्याचे निदर्शनात आले आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा मका खरेदी अभावी शिल्लक असून मका उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तरी सदर खरेदी केंद्रात बंद असलेली मका खरेदी तत्काळ सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती श्रीमती स्मिता वाघ यांनी केली आहे. सदर निवेदन देताना प्रांताधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार मिलिंद वाघ यांनी स्वीकारले. यावेळी पं.स.चे उपसभापती भिकेश पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस जिजाब पाटील, राकेश पाटील, संजय पाटील, नाटेश्वर पाटील, सदा बापू, मच्छिंद्र पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी राजपूत, आयज बागवान उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!