मुंबई : मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या दि.२९ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. कोरोना संकटामुळे यंदा सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दहावी परीक्षेचा निकाल कधी लागणार ? याची सगळ्यांना प्रतिक्षा लागून होती. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळा वर निकाल उपलब्ध होणार आहे. पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार –
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
शिक्षण मंडळाकडून मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागांत विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ विद्यार्थी, तर ७ लाख ८९ हजार ८९८ विद्यार्थिनी आहेत. एकूण ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या विषयाचे गुण आता इतर विषयांमध्ये मिळणाऱ्या गुणांच्या सरासरीनुसार दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकित प्रती साठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.