अमळनेर : तालुक्यातील निंभोरा येथील प्रगतशील शेतकरी सुरेश पिरण पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसकडून ‘जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.भैय्यासाहेब संदीप पाटील यांचे हस्ते चोपडा येथे नुकतेच सदर निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले हे असून महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पाष्टे आहेत.
सुरेश पाटील हे तालुक्यातील प्रगतशील शेतकरी असून महाराष्ट्र शासनाने त्यांना “कृषिभूषण” पुरस्कार देऊन गौरविले आहे. मुंबई येथील आरसीएफ कंपनी कडून त्यांना ‘प्रगतिशील किसान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असून अमळनेर तालुका शेतकी संघाचे माजी चेअरमन आहेत. फळबाग, बागायती पिके अशा विविध पिकांवर त्यांचे नेहमी संशोधन सुरू असते. इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होतो. योग्य व्यक्तीला न्याय मिळाल्याने शांताराम बापू तसेच अमळनेर तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे यांनी समाधान व्यक्त केले. चोपडा येथे सदर नियुक्तीपत्र देताना महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुलोचना वाघ, प्रा.सुभाष पाटील, ॲड.गिरीश पाटील, अमळनेर तालुका रेशनिंग कमिटीचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, कुंदन पाटील, जिल्हा प्रशासकीय सरचिटणीस (काँग्रेस) अजबराव पाटील उपस्थित होते. पाटील यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.