अमळनेर बस आगारात डिझेल संपल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल

बाहेरगावच्या बसफेऱ्या रद्दमुळे आगारात बसेसची गर्दी ; सामान्य व ज्येष्ठ प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

अमळनेर : एस.टी.महामंडळाच्या अमळनेर आगारातील डिझेल संपल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. डिझेल संपल्याने दुपारी दोन वाजेपासून आगारातील बाहेरगावी जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी अमळनेर ये-जा करीत असतात. दुपारनंतर बसफेऱ्या बंद केल्याने असंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी बस स्थानकावरच अडकले. घरी पोहचण्याची नेहमीची वेळ चुकल्याने पालकांचीही धांदल उडाली. काहींनी मिळेल त्या वाहनाने घरी जाणे पसंद केले. सामान्य जनता व ज्येष्ठ प्रवाशांच्या गरीबरथाची चाके बंद पडल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसत खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला. जिल्हा कंट्रोलर राजेंद्र आत्माराम देवरे यांनी आगारास भेट दिली मात्र वरुनच डिझेल नसल्याने काहीही मार्ग निघू शकला नाही. यामुळे प्रवाशी व विद्यार्थीवर्ग संतापला होता. एस.टी.महामंडळावर सामान्य जनतेने विश्वास ठेवावा की नाही अशी स्थिती आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे एस.टी. ची खाजगीकरणाकडे वाटचाल आहे काय ? अशी कुजबुज आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!