अमळनेर : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती आहे. विविध महत्त्वाचे काम असो वा सण सर्वांनाच परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अनेक महिलांना रक्षाबंधन सणाला माहेरी जाता आले नाही व भाऊ देखील येऊ शकला नाही. बहिणीचा पाठीराखा भाऊ असतो तसाच अंगणातील वृक्षदेखील मायेची सावली देतो ही भावना ठेवून अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी एकत्र येत अंगणातील वृक्षाला आपला भाऊ मानून रक्षाबंधन सण आगळ्या वेगळ्या स्वरुपात साजरा केला. सर्वांनी शासन निर्देशांचे पालन करत तोंडावर मास्क लावला होता. प्रत्येकाने आपल्या अंगणात एक झाड लावून भाऊ समजून त्याचे जतन करावे असा संदेश वृक्षवल्ली परिवाराच्या अध्यक्षा सौ.निलीमा सोनकुसरे यांनी दिला.
वृक्षवल्ली परिवार, साईनाथ महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी पर्यावरण पूरक राखी तयार करुन नगरसेविका ज्योतीताई धनुभाऊ महाजन यांचे हस्ते वृक्षाला राखी बांधण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या नाथपंथी समाज महासंघ उत्तर महाराष्ट्र व वृक्षवल्ली परिवार उपाध्यक्षा सौ.शोभा रघुनाथ शिंदे यांचा वाढदिवसही वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. शिवधाम, साईबाबा मंदिर रोड, अंबर्षी टेकडी आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. श्रीमती भानुमती बाबुलाल शहा गौ शाळा व तपोवन येथेही भेट दिली. कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ.अपेक्षाताई पवार यांनी सुविधा उपलब्ध करुन दिली. याकामी वृक्षवल्ली परिवार महिला सदस्या वैशाली बडगुजर, प्रिती कुलकर्णी, निर्मला पाटील, अर्चना आठवले, निशा पाठक, पूनम पाटील, मीना लोहार, योगिता पांडे यांचे सहकार्य लाभले.