राज्यात आता मान्सून सक्रिय होईल; मुसळधार पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पूरस्थिती निर्माण होवू शकते. मागील आठवड्यात तुरळक ठिकाणी बरसल्यानंतर राज्यात आता मान्सून सक्रिय झाला आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर हवामान खात्याने मुंबई परिसरात आज (५ ऑगस्ट) रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भागादरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काल मंगळवारपासून ते शनिवार ७ ऑगस्टपर्यंत कोकण, घाटमाथ्यावर विदर्भाच्या पूर्व भागात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात व विदर्भातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व भागादरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या परिसरात समुद्रसपाटीपासून २.१ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या सर्व घटकांचा परिणाम पावसाला अनुकूल आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीकडे…
आज (दि.५) रोजी सायंकाळी ४ वाजता कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फूट ७ इंचावर होती. तर इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूट आहे. आज सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील ९९ बंधारे पाण्याखाली गेले होते. तर एकूण कोल्हापूर जिल्ह्यातील १५ मार्ग बंद झाले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!