पातोंडा ग्रामपंचायत लिपिक भरती प्रकरणी तक्रार अर्जावर गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या दालनात झाली सुनावणी

कार्यवाहीबाबत अहवाल पाठविण्याचे ग्रामपंचायत ला आदेश

अमळनेर : तालुक्यातील पातोंडा ग्रामपंचायत लिपिक भरती दि.१४ फेब्रुवारी २०२० रोजी निघाली. यावेळी नियमाप्रमाणे अर्ज मागविण्यात आले होते. दि.३० एप्रिल २०२० रोजी सदस्यांच्या झालेल्या मासिक मिटिंग मध्ये संगनमताने गुणवत्तापूर्ण उमेदवारावर अन्याय करून मेरिट, मार्क, शैक्षणिक अर्हता न पाहता परस्पर बहुमताचा डाव खेळून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अक्षय नेहरू पवार या उमेदवाराची सदस्यांनी निवड केली. गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या दालनात इतर सहा उमेदवारांनी केलेल्या तक्रार अर्जावर काल दि.०५ ऑगस्ट रोजी सकाळी सुनावणी घेण्यात आली. पातोंडा ग्रा.पं. लिपिक भरती प्रकरणी झालेल्या कार्यवाहीबाबत ग्रामपंचायतने अहवाल पाठविण्याचा आदेश गटविकास अधिकारी यांनी दिला आहे.

सुनावणी वेळी ग्रा.पं. प्रशासनावर दबाव आणून कोणतीही चर्चा न करता कोणत्या आधारावर निवड केली ? पहिल्या क्रमांकावर असलेल्या राकेश विलास पाटील यांची निवड अपेक्षित असताना का डावलले ? तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुनील भिकन पाटील या उमेदवाराला सोडून अक्षय नेहरू पवार याचीच निवड कशी केली गेली ? इतर उमेदवार यांचा विचार का केला गेला नाही ? अशी विचारणा यावेळी करण्यात आली. तेव्हा ग्रामसेवक बी.वाय.पाटील आणि सरपंच किशोर मोरे यांनी सांगितले की, काही सदस्यांनी राजकीय दबाव आणला. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सदस्यांना सांगितले की, आपल्याला पहिल्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार निवडी बाबत चर्चा करायची आहे परंतु काही सदस्यांनी साध्या कागदावर बहुमत चाल खेळत चुकीच्या पद्धतीने तिसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार निवड करण्यास सांगितले. इतर उमेदवार यांचे असे म्हणणे आहे की, भरतीत आर्थिक व्यवहार झालेला आहे तेव्हा मॅनेज करून बहुमत डाव खेळला गेला आणि जाहिरात नियम प्रकिया यांचा विचार केला गेला नाही. शिवाय गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज प्रलंबित असताना सरपंच यांच्या सहीने ऑर्डर दिलीच कशी ? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. एकीकडे मुलं स्पर्धा परीक्षेचा रात्रंदिवस अभ्यास करून रक्ताचं पाणी करून परीक्षेची तयारी करत आहेत व दुसरीकडे वशिलेबाजीतुन निवड केली जात असेल तर हा गुणवत्ता असलेल्या उमेदवारांवर अन्याय आहे. तेव्हा गावकरी संतप्त झाले असून सर्वच स्तरातून या चुकीच्या निर्णयाला विरोध होत आहे. भरती रद्द करून पारदर्शक पणे प्रकिया राबविण्यात येईल अथवा शैक्षणिक अर्हता लक्षात घेता जाहिरात नियमांनुसार भरती होईल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

अन्याय झालेल्या उमेदवारांची प्रतिक्रिया…

पातोंडा ग्रा.पं.लिपिक भरतीत उमेदवारांची शुद्ध फसवणूक झाली आहे. जर ग्रा.पं. सदस्यांना चुकीच्या पद्धतीने बहुमताचा डाव खेळून भरती करायची होती तर जाहिरात काढलीच कशाला ? पारदर्शक पणे भरती होणे गरजेचे होते; शैक्षणिक अर्हता, मेरिट, मार्क्स, गुणवता यांचा विचार न करता, वशिलेबाजी आणि धनशक्तीच्या जोरावर चुकीच्या पद्धतीने संगनमताने निवड केली जात असेल तर गोरगरिबांच्या मुलांनी कोणते पाप केलं आहे ? दिनदुबळ्या लोकांवर हा अन्याय असून गावकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. – राकेश विलास पाटील

ग्रा.पं. सरपंच पातोंडा आणि ग्रामसेवक यांनी पारदर्शक पणे भरती करण्याचे आश्वासन दिले होते परंतु इतर उमेदवारांना फसविण्यात आले असून नाटकीय पध्दतीने बहुमत घेऊन चुकीच्या गोष्टी करून साध्या कागदावर रडीचा डाव खेळून उमेदवार निवड केली आहे. – नितीन मंगल पारधी

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!