पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्ष कटीबध्द : ना.गिरीष महाजन

पक्षश्रेष्ठींनी विचार करुन निर्णय घेतलेला असल्याने पक्षाचे कामाला महत्व द्या व महायुतीचे उमेदवार शिरीष चौधरींना निवडून आणा.

अमळनेर : महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन महायुतीचे उमेदवार शिरीष चौधरी यांना निवडून आणण्यासाठी जबाबदारीने बुथ मजबूत करुन बूथनिहाय भरघोस मते मिळवावी. आपला उमेदवार निवडून येण्याकरिता रणनिती आखून उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा मार्गदर्शक गिरीश महाजन यांनी केले. येथील बन्सीलाल पॅलेसमध्ये ता.१७ रोजी भाजप, शिवसेना, रिपाई , शिवसंग्राम , रासप, रयतक्रांती मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शिरीषदादा चौधरी यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

नामदार गिरीष महाजन यांचे हेलिकॉप्टर प्रताप महाविद्यालयाच्या मैदानात उतरवण्यात आले असता, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचाच प्रचार केला. ‘एकच वादा.. अनिलदादा’, ‘एकच पुत्र.. भूमीपुत्र’ अशा घोषणा देत महाविद्यालयाचा परिसर दणाणून सोडला होता. असंख्य विद्यार्थ्यांचा विरोध यातून दिसून आला. काय ते प्रत्यक्ष निवडणूक निकालातून स्पष्ट होईलच.


श्री महाजन पुढे म्हणाले की, शासन व मुख्यमंत्री साहेबांचे सर्वात जास्त प्राधान्य पाण्याला व विकासाला आहे. यामुळे विकासाला प्राधान्य दिले जाईल. अनेक वर्षांपासून रेंगाळलेला पाडळसरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारण ३ वर्षे लागतील.. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्ष कटीबध्द असल्याचे आश्वासनही दिले. पक्षश्रेष्ठींनी विचार करुन निर्णय घेतलेला असल्याने सर्वांनी पक्षाचे कामाला महत्व द्या, अंग चोरुन काम करणे बंद करा अन्यथा आस्तित्व धोक्यात येवू शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटन मंत्री किशोरभाऊ काळकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार बी.एस.पाटील, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ.रविंद्र चौधरी, अँड.ललिता पाटील यांनीही मार्गदर्शन केले. शिरीषदादा किती मताधिक्क्याने निवडून येतील हे गिरीषभाऊच चांगले सांगू शकतील कारण ते आकडे काढण्यात पटाईत असल्याचे सांगत पक्षाचा उमेदवार निवडून द्या असे कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी सांगितले.

उदय वाघ म्हणाले की, तालुक्याचं आता ठरले आहे. तालुक्यात विकासाच्या दिशेने मतदान होणार आहे. अमळनेरसह जिल्ह्यातील सर्वच ११ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील. अमळनेर मतदार संघातून पन्नास हजार पेक्षा जास्त मताधिक्याने शिरीष चौधरी यांना निवडून आणा असे आवाहन केले.

या मेळाव्यात रेखाताई चौधरी, पं.स.सभापती वजाबााई भिल, बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार, कामराज पाटील, कामगार नेते रामभाऊ संदानशिव, बाळासाहेब जीवन पाटील, शिवसेनेचे राजेंद्र पिंगळे, विजय पाटील, हरचंद लांडगे, श्याम अहिरे, बजरंग अग्रवाल, लालचंद सैनानी, व्ही.आर.पाटील, उमेश साळुंखे, महेश पाटील, माजी आयपीएस साहेबराव पाटील, विक्रांत पाटील, रासपचे बाळू पाटील, श्याम संदानशिव, ज्योती भोई, सुरेखा पवार, श्रीराम चौधरी, सलीम टोपी,अबू महाजन, बाळासाहेब संदानशिव, सुनील भामरे, सुरेश पाटील, शरीफ भाया, फिरोज मिस्तरी, शिरीष दादा मित्र परिवार व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!