अमळनेर : शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात संशयित डेंग्यु मलेरिया आजाराचे रुग्ण आढळून आले असून काही रुग्ण उपचार घेत आहेत. आपल्या परिसरात वा गावात डेंग्यु रुग्ण आढळण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी व गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी केले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकानी पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे किंवा कापडाने घटट बांधावे. डांस-अळया आढळून आलेले कन्टेनर (भांडी) टाक्यांना संपुर्ण कोरडे करावे. संपुर्ण भांडी घासुन पुसून कोरडे करुन एक कोरडा दिवस पाळावा. टाकाऊ वस्तू, फुटलेले माठ, टायर, नारळाच्या करवंट्या, कुलरचे पाणी, फुलदाणीतील पाणी ७ दिवसापेक्षा जास्त दिवस साचवू नये. याबाबत ग्रामीण भागात ग्रामस्थांनी दवंडीचे महत्व लक्षात घेऊन आरोग्यासाठी सहकार्य करावे. डांस,अळया साचलेल्या पाण्यातुन डासांत रुपांतर होते. गटारीचे पाणी व सांडपाणी वाहते करावे, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. डबक्या-डबक्यात गप्पीमासे सोडावे. डासोत्पत्ती स्थानके नष्ट करावी. डासोत्पत्ती स्थानकात वापरलेले ऑईल टाकावे अशा सूचना एका पत्रकाद्वारे केल्या आहेत.