
अमळनेर : विधानसभा मतदार संघात निवडणूकीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना ता.१९ रोजी सायंकाळी घडली. धरणगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार बळीराम विश्राम पाटील (वय ५७), रा. एरंडोल असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ता.२१ रोजी विधानसभा मतदान असल्याने ता.१९ रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना तालुका बदल करून ठरलेल्या ठिकाणी निवडणूक कर्तव्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यातील पोलीस कर्मचारी बळीराम पाटील यांना निवडणूक बंदोबस्तासाठी अमळनेर तालुक्यातील निंभोरा गावात बुथ बंदोबस्त देण्यात आला होता. यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. सदर घटना पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना समजताच त्यांनी तात्काळ बळीराम पाटील यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली मात्र.. हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.