आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अमळनेर : गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अमळनेर मतदारसंघात मूग, उडीद पिकाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी मूग, उडीद पिकाचे पंचनामे करण्यासंबधी अधिका-यांना तातडीने आदेश दिले आहेत. आदेशान्वये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी देखील सोमवारी तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश दिल्याने मतदारसंघातील गावातील शेतकऱ्यांच्या उडीद मूग पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सोमवारपासून सुरू झाले आहेत.
सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अमळनेर व पारोळा तालुक्यातील मूग आणि उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांचेकडे येत होत्या. उडीद मूग पिकाला विम्याचे कवच नाही त्यामुळे या पिकांचे नुकसान शासन ग्राह्य धरत नव्हते याबाबत खान्देशात मोठ्या प्रमाणावर उडीद, मूग पिकांचे उत्पन्न घेतले जाते. अल्पावधीत येणारे पीक असून खर्च अत्यंत कमी प्रमाणात लागतो मात्र यंदा पावसाने उघडीप दिली नसल्याने अमळनेर व पारोळा तालुक्यातील विविध गावात शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी तात्काळ राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण नुकसानीची माहिती देत शासनाकडून शेतक-यांना मदत द्यावी अशी विनंती केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. चार दिवसांपूर्वी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन उडीद, मूग पंचनाम्याची मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी सोमवारी खान्देशातील उडीद, मूग पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले व शेतक-यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे.