अमळनेर : येथील शिक्षण क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व तथा धनदाई संस्थेचे आधारस्तंभ आबासाहेब वसंतराव तानकु पाटील यांचे नाशिक येथे खाजगी रुग्णालयात दि.२७ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. गेले महिनाभरापासून ते फुफ्फुसाच्या आजारामुळे मृत्यूशी झुंज देत होते पण दुर्दैवाने ती झुंज यशस्वी होऊ शकली नाही. मृत्यू समयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. विवेक पाटील, हृदयरोगतज्ज्ञ श्रीकांत पाटील व सयाजीराव पाटील यांचे ते वडील होत.
तालुक्यातील दोधवद हिंगोणे येथे जि.प.शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. दरम्यानच्या काळात नोकरीचा राजीनामा देवून डी.डी.पाटील यांच्या साथीने अमळनेरच नव्हे तर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. जळगाव येथून सन २०११ मध्ये पुण्य प्रताप नावाचे दैनिक सुरु करुन त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात नावलौकिक मिळविला. राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. सर्वांचे मार्गदर्शक, पुरोगामी चळवळीशी बांधिलकी जपणारे नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया उमटली. शहरातील विविध संस्थांतर्फे आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !