‘साने गुरुजींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार कार्यक्रम संपन्न
अमळनेर : आज देशाला थोर व्यक्तींच्या विचारांची गरज असल्याने चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी. थोर व्यक्तींचे विचारच भारताला प्रगत करु शकतील असे मत जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांनी व्यक्त केले. ते मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ ऑगस्ट रोजी आयोजित ‘साने गुरुजींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या सानेगुरुजींच्या विचारानुसार आजच्या पिढीला मार्गदर्शन करता येईल असा उद्देश ठेवून मराठी विभागांतर्गत ‘साने गुरुजींच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. अन्य प्रमुख मान्यवरात जळगाव उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ.सतीश देशपांडे होते. प्रमुख वक्ते म्हणून अमरावती विभागाचे सह संचालक डॉ.केशव तुपे व ज्येष्ठ साहित्यिक तथा शिरपूर येथील एस.पी.डी.एम. महाविद्यालयाचे प्रा.डॉ.फुला बागुल होते. वेबिनारला सानेगुरुजींचे विचार पेरणारे प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अरविंद सराफ, जामनेर महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष पाटील यांचीही उपस्थिती होती.
ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनारचे समन्वयक तथा मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.संजय पाटील यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. वेबिनारला शुभेच्छुक म्हणून संदेश देताना संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव मन्साराम पाटील यांनी साने गुरुजींचा जीवनपट मांडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय संस्कृतीचे उपासक सानेगुरुजी चे विचार आपल्याला समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. यानंतर मान्यवरांचा परिचय व सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते डॉ.केशव तुपे व प्रा.डॉ.फुला बागुल यांनी सानेगुरुजींच्या विचारांचे पैलू उलगडले. आपल्या बहारदार शैलीत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण विवेचन केले. ऑनलाईन कार्यक्रमास श्रोत्यांनी दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सतीश पारधी यांनी तर वेबिनारचे समन्वयक प्रा. डॉ. संजय पाटील यांनी आभार मानले. या संपूर्ण वेबिनारच्या यशस्वितेसाठी ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवडचे संचालक मंडळ, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.