महिला राष्ट्रवादी काँग्रेसने दिले तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन
अमळनेर : केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी अशा मागणीचे निवेदन येथील महिला राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार मिलिंद वाघ यांना नुकतेच दिले. यावेळी जि.प. सदस्या जयश्री अनिल पाटील, जळगाव जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निरीक्षक रंजना देशमुख, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योजना पाटील, अलका पवार, भारती शिंदे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती बागुल, अर्बन बँकेेेचे संचालक प्रविण पाटील, डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पीक लावले आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच भाजप सरकार ने कांदा निर्यात बंदी घातली. बिहार मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी घातली असून हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार नाही हेच यातून स्पष्ट होते. एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकारने देशोधडीला लावला आहे. दुष्काळ, गारपीट, टंचाई, रोगराई अशा कित्येक नैसर्गिक आव्हानांचा सामना शेतकरी करीत असताना, पोटाच्या मुलांप्रमाणे सांभाळलेले पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी टिकला तरच शेती पिकेल. कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत बळीराजा राबताना दिसला. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी रद्द करावी व शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.